पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १११ )


बोलणे सुरू केलें; आणि " तूं जर तह करण्यास तयार असशील तर निजा- शाही राज्य आपण आपसांत वांटून घेऊं; व या वांटणांत तीन हिस्से तुला देईन; " असे त्यास कळविलें. शहाजहानचें हे म्हणणें आदिलशहास अती- शयच फायदेशीर असल्यामुळे त्यानें तें तात्काळ मान्य केले; त्याने शहाजीचा पक्ष सोडला; आणि मे महिन्यांतच त्या उभयतांमध्यें तह झाला; त्यांत खालील कलमें ठरली ती:- (१) अदिलशहानें मोंगल बादशहाचे वर्चस्व मान्य करावें, व यापुढे त्याचे हुकूम पाळण्याचे कबूल करावें. (२) निजामशाही राज्य नष्ट झाले असे समजून त्या राज्यांतील प्रदेश अदिलशहा व मोंगल- बादशहा या उभयतांनी वांटून घ्यावा, व हा वांटलेला प्रदेश ताब्यांत घेण्यास मोंगल सरदारांना आदिलशहानें हरकत घेऊं नये. ( ३ ) सोलापूर, वांगी, परिंडा, भालकी, चिदगुपा, पुणे, सुपें व चाकण सुद्धां निजामशाहीच्या ताब्यांतील कोंकणप्रांत म्हणजे एकंदर ८० लाख उत्पन्नाचे पन्नास परगणे- अदिलशहाने घ्यावे; व बाकीचा सर्व निजामशाहीचा प्रदेश मोंगल बादशहानें घ्यावा. ( ४ ) अदिलशहानें शहाजहान बादशहास नजराणा म्हणून वांस लाख रुपये द्यावे. ( ५ ) गोवळकोंडेकर कुत्बशहाच्या प्रदेशास अदिलशहानें कोणत्याही प्रकारें उपसर्ग करूं नये; ( ६ ) कोणीहि एकमेकांच्या सरदारांस फितवूं नये, अथवा आश्रय देऊं नये; ( ७ ) शहाजी भोसले, हा जुन्नर, त्रिंबक व दुसरे कांहीं किल्ले बळकावून बसला आहे ते सर्व तो मोंगल बाद- शहाच्या स्वाधीन करीपर्यंत त्यास अदिलशहानें आश्रय देऊं नये. येणेप्रमाणे तह ठरल्यानंतर शहाजहान यानें ता० ६ मे इ. स. १६३६ रोजीं ह्रीं तद्दाची कलमें, सोन्याच्या पत्र्यावर कोरवून मोठ्या समारंभानें अदिलशहाकडे रवाना केली.

 अशा रीतीनें अदिलशहास शहाजीच्या पक्षांतून फोडल्यामुळे, शहाजीचा आधार व मदत नष्ट होऊन तो उघडा पडला; विजापूरकराशी तह झाल्या- मुळे सर्व मॉगल सैन्याच्या एकवटलेल्या आणि त्यांतच विजापूरकरांच्या सैन्याची भर पडलेल्या शक्तीबरोबर त्याला एकट्यालाच आतां झगडण्याचा प्रसंग प्राप्त झाला होता. तथापि इताश न होता, अथवा हिंमत न सोडतां