Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३८ )

भौम सत्ता मान्य केली होती. (इ. स. पूर्वी २२६ ); परंतु त्याच्या मृत्यू - नंतर ते पुन्हा पूर्णपणे स्वतंत्र झाले, आणि त्यांचा दुसरा राजा कृष्ण याच्या कारकीर्दीत त्यांनी मोठ्या झपाट्यानें आपल्या राज्याचा विस्तार करीत दक्षिण हिंदुस्थानांतील प्रदेश काबीज करून थेट नाशिक शहरापर्यंत आपला अम्मल बसविला; व काठेवाड ; कच्छ व सिंघ हे प्रांतही आपल्या हस्तगत करून घेतले; परंतु त्यांच्या पश्चिम सरहद्दीवरील शत्रूशीं त्यांना नेहमीं झगडत रहावें लागल्यामुळें काठेवाडासह तीन्हीं प्रांतांवरील त्यांचा अम्मल लवकरच नामशेष झाला. त्यांच्या राजधानीचे ठिकाण कृष्णानदीच्या मुखाशीं असलेले धरणीकोट या नावाचं एक शहर होते; त्यांची राजधानी कृष्णातीरीं ' श्रीकाकुलं ' हें शहर होतें असाही उल्लेख आढळतो. - राष्ट्रीय घराण्यानें गोदावरी नदीपर्यंतचा प्रदेश हस्तगत केल्यानंतर त्यांच्या राजधानीचे शहर प्रतिष्ठान उर्फ पैठण बनले; या ठिकाणी 'सप्तशती' या ग्रंथाचा कर्ता व प्रसिद्ध राज्यकर्ता हाल उर्फ शालीवाहन अथवा शातवाहन हा होऊन गेला; व त्यावरूनच या घराण्यांतील पुढील राज्यकर्त्यांना 'शालीवाहन राजे' अथवा 'शातवाहन राजे' असें म्हणण्याचा प्रघात पडला.
 या काळांत कृष्णा नदीचे दक्षिणेकडील तामिली मुलुखांत, पांड्य, चोल, केरळपुत्र व सत्यपुत्र अशीं चार राज्ये होतीं; त्यांपैकीं पांड्य राज्य दक्षिण दिशेस असून त्याचा विस्तार दक्षिणोत्तर पदुकोटाईपासून कन्याकुमारीपर्यंत, व पूर्व पश्चिम कारोमांडल किनाऱ्यापासून त्रावणकोर येथें जातांना मार्गांत असणाऱ्या आच्छ- न्कोविल घांटापर्यंत, होता. या राज्याची राजधानी अनुक्रमें कोकाई व मदुरा हीं शहर होती; कोकई हैं शहर पूर्वकाळीं एक अत्यंत भरभराटीत असलेले बंदर होते; परंतु तेथील खाडींत गाळ सांचल्यामुळें तें निरुपयोग होऊन तेथील ब्यापार पहिल्यानें कायल व तेथून तुतिकोरीन या ठिकाणांहून होऊं लागला. पांड्य राज्य इ. सन ९९४ च्या सुमारास चोल राजा राजराज याचे मांडलीक बनलें; प्रोफेसर किलहार्न यार्ने, इ. सन ११०० पासून १५६७ पावेतों सत्रा पांख्य राजांच्या नांवाचा शोध लाविला असून त्यांतील 'जटावर्म सुंदर' या नांवाचा राजा ( इ. सन १२५१ ते १२७१ ) बराच शूर होता, असें त्याचें म्हणणे आहे; इ. सन १३१० या वर्षी मलिक काफूरने या प्रांतावर स्वारी केल्यानंतर, जरी हे घराणे पूर्णपणे नष्ट झालें नाहीं तरी, तें आपला जीव जग- बूनच कसें बसें पुढे काही काळपर्यंत जिवंत राहिलें होतें.