Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३७ )

असून दानधर्माबद्दल त्याची पुष्कळ ख्याति आहे; व त्यानें अबूच्या पहाडा जवळील वारनस नदीवर व कावेरी आणि तापी नदीवर अप्रतिम घाट बांधल्या- बद्दल तो प्रसिद्ध आहे; त्याप्रमाणेंच शक सत्रपाचें स्वातंत्र्य इ० सन ७८ पासून सुरू झालेले असल्यामुळे या गोष्टीच्या स्मरणार्थ या वर्षापासूनच 'शक' या - नांवाची वर्ष गणना चालू करण्यात आलेली आहे; त्यानंतर चस्थान अथवा चष्टन हा गादीवर आला; तो बराच शूर असून त्याने मालव लोकांस नामोहरम लेलें; नंतर जयदामा व रुद्रदामा हे अनुक्रमें गादीवर आले; त्यांपैकी रुद्र- दामा हा विशेष शूर असून त्यानें दक्षिणेकडील शातकर्णी राजाचा व बौधेय या नावाच्या एका शूर जातीचा पराभव केला, व बऱ्याच प्रमाणांत आपल्या घराण्याचे वैभव वाढविलें; शिवाय हा बराच प्रजादक्ष असून त्यानें गिरनार जवळील 'सुदर्शन' या नांवाच्या तलावाची दुरस्ती केली. हें राज्य एकंदर सव्वीस पिढ्या चालत राहिलें, व सत्तावीसाव्या पुरुषाच्या कारकीर्दीत तें व क्षत्रप वंश नामशेष झाला. इ० सन ३०० च्या सुमारास क्षत्रप घराण्याची सत्ता कमजोर होऊन हैहय वंशज ईश्वरदत्त त्रैकूटक यानें स्वतंत्र राज्य निर्माण केले; तथापि पांचव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास प्रसिद्ध गुप्त घराण्याने हे दोन्हीही वंश नाहींसे करून सौराष्ट्र देश आपल्या राज्यांत सामील केला.
 मागधीय साम्राज्य नष्ट झाल्यानंतर हिंदुस्थानांत अनेक लहान मोठीं निरनिराळीं राज्य निर्माण झालीं, त्यांतच तेलगू भाषा बोलणारांचें जें आंध्र राज्य त्याची गणना आहे. हे लोक मूळचे द्राविडी असून मौर्य घराण्यांतील राज्यकर्त्यांच्या कारकीर्दीत — कृष्णा व नर्मदा या दोन महानद्यांमधील व्यापक प्रदेशाच्या पट्ट्यांत - रथीय, सथीय व आंध्र ह्रीं तीन घराणीं राज्य करीत होती; त्यांपैकीं रथीय अथवा राष्ट्रीय घराणें पश्चिमेकडील प्रदेशांत म्हणजे महाराष्ट्रांत राज्य करीत होतें; त्यामुळे ह्या प्रदेशास " महाराष्ट्र " हें नांव मिळाले अशी महाराष्ट्र या शब्दाची एक व्युत्पत्ति करण्यांत येते. दुसरें म्हणजे सथीय अथवा सतीय हे घराणे उत्तरेकडील प्रदेशांत राज्य करीत होतें; परंतु तें पुढे महारथीयांत मिसळून जाऊन त्यांची एक भाषा झाली. तथापि आंध्र लोकांचे म्हणजे तेलगू भाषा बोलणारांचे तिसरें राज्य निराळें व स्वतंत्र राहिलें; या घराण्यांतील मूळ पुरुष शिशुक अथवा सिमुक हा असून चंद्रगुप्त मौर्याचे काळांत त्याचे राज्य भरभराटींत होतें; या आंध्र घराण्यानें अशोकाची सार्व-