Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३४ )

होते; त्यांपैकी शेवटच्यास, आंध्र राजकर्ता शिशुक (यांस शिमुक, सिमुक किंवा शातवाहन अशीही नांवें आहेत. ) याने इ. सनापूर्वी २७ यावर्षी ठार मारिलें, व आपल्या अधिवंशाचे स्वतंत्र राज्य स्थापन केलें.
 अफगाणिस्थान देशाच्या पश्चिम भागांत शक लोकांनीं आपले राज्य स्थापन करून त्यास 'शकस्थान' हे नांव दिल्याचा वर उल्लेख आलेला आहेच; हे शक लोक जरी हिंदुस्थानांतील त्यांच्या दुसऱ्या शाखेपासून इतक्या दूरवर स्थाईक झाले होते, तरी त्यांनी हिंदुस्थानांतील शक लोकांशी असलेला आपला पूर्वसंबंध कायम ठेविला होता. या शक लोकांच्या राज्यास लागूनच पार्थियन राज्य असून तेथे यावेळी आससेस थियॉस या नांवाचा राजा राज्य करीत होता. त्यानें इ. सनापूर्वी ६० च्या सुमारास शकस्थानावर स्वारी केली, तेव्हां हिंदुस्थानांत माळवा प्रांती असलेली आपली फौज शक लोकांनीं तिकडे युद्धा- करितां पाठविली. यावेळी माळवा प्रांतांत 'मालव' या नांवाचें एक बलिष्ठ क्षत्रिय घराणे अस्तित्वात होते; या घराण्याने शक लोकांबरोबर युद्ध करण्याची तयारी केली, आणि पंजाब प्रांतांतील मुलतान शहरानजीक करार येथे त्यांच्याशीं मोठें निकराचे युद्ध करून त्यांचा पराभव केला; (इ. स. पूर्वी ५७ ह्या वर्षाच्या सुमारास) व या गोष्टीच्या स्मरणार्थ त्यांनीं या वेळेपासून 'संवत्' या नांवाची वर्ष गणना सुरू केली.
 इ० सनापूर्वी १३० च्या सुमारास शक लोकांस, यु-एची उर्फ 'युच्ची' या नांवाच्या दुसऱ्या एका शाखेनें पूर्व तुर्कस्थानांतून हाकलून दिले, तेव्हां वे पश्चिम तुर्कस्थानात येऊन आक्सस नदीच्या दोन्हीं तीरांवर वस्ती करून राहिले. या युच्ची लोकांत पांच पोट जाती होत्या; त्यापैकीं ' कुशान ' या पोट जातींतील अथवा वंशांतील - पहिला व दुसरा कडफिसेस ( कदफिसीज ) हे दोन, प्रसिद्ध राज्यकर्ते होऊन गेले; त्यांपैकी पहिला कडफिसेस हा राजा झाल्यावर ( इ. सन. १५ ) त्यानें अफगाणिस्थान व बुखारा हे प्रांद आपल्या ताब्यांत आणिले, व सिंधु नदीपर्यंतचा प्रदेशही आक्रमण केला; हा राज्यकर्ता शूर असून तो ८० वर्षांचा होऊन मृत्यु पावला. त्यानंतर त्याचा मुलगा दुखरा कडफिसेस हा -ई. सन ४५ या वर्षी यादीवर आला. हा राज्यकर्ता विशेष धाडशी महत्त्वाकांक्षी व शूर असून त्यानें आपल्या पांची पोट जातींचे ऐक्य घडवून आणिलें; इंडो-पार्थियन राज्यें साफ बुडवून टाकिलीं, व त्याऐवजीं