Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३ )

आपल्या साम्राज्यभर प्रसिद्ध केल्या, आणि त्या धर्माच्या अभिवृद्धीकरितां नेपाळ, काश्मीर, अफगणिस्थान, गुजराथ व सिंहल द्वीप उर्फ सिलोन इतक्या दूरवरच्या प्रदेशांपर्यंत त्यानं धर्मोपदेशक पाठविले; अशा रीतीनें राजाश्रय मिळून बौद्ध धर्म जोरांत आल्यामुळे तो हिंदुधर्माला एक अत्यंत बलि प्रति- स्पर्धा निर्माण झाला, व हिंदुधर्माबरोबर त्याचे अनेक जोराचे व चिकाटीचे झगडे झाले. हिंदुधर्मप्रचारकांबरोबर झगडण्यात ' सांख्यदर्शन ' या ग्रंथाचा कर्ता कपिलमुनि हा अग्रेसर होता. त्याच्यामागून प्रसिद्ध जैमिनी आणि व्यास या ऋद्रियांनी अनुक्रमें ' पूर्वमीमांसा ' व ' उत्तर मीमांसा' यांची रचना केली. गौतममुनीनें तर्क अथवा 'न्याय' शास्त्राव एक ग्रंथ निर्माण केला; कणाद याने याच शास्त्राच्या एका अंगाची ' वैशेषिक' या ग्रंथामध्ये रचना केली, आणि पातंजलीने योगावर एक ग्रंथ निर्माण केला, व अशा रीतीनें त्यांनी हिंदुधर्मातील कांहीं मुख्य तत्त्वांचा अनादर केला. तथापि वेदांचे प्रामाण्य, म्हणजे वेद हे अपौरुषेय आहेत हैं तत्त्व त्यांनी मान्य केले; परंतु त्यानंतर लवकरच ही परिस्थिति बदलली, व वेदांचे महत्त्व न मानणारे, इतकेंच नव्हे तर ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलही उघडपणें शंका घेणारे नास्तिक असे तत्रज्ञानी व उपदेशक एकामागून एक उत्पन्न झाले; आणि त्यांनी आपलीं मर्ते लोकांपुढे मांडण्याचा व तीं योग्य रीतीने प्रतिपादन करून जनसमूहास आपल्या मताचे करून घेण्याचा उपक्रम केला; या तत्त्वज्ञानामध्ये चार्वाक हा प्रमुख असून याच्या काळापासून कर्मपंथ ' व 'ज्ञानपंथ' असे दोन धार्मिक पंथ निर्माण झाले; व त्यानंतर बौद्ध, जैन, निग्रंथ, नास्तिक, वगैरे निरनिराळे चौदा पंथ अस्तित्वांत आले. त्यांपैकी पहिले दोन म्हणजे बौद्ध व जैन हे धर्म विशेष वृद्धिंगत झाले असून ते निरनिराळ्या दोन महापुरुषांनी स्थापन केले आहेत.
 या दोन धर्मापैकी बौद्ध धर्माची स्थापना गौतमबुद्ध यानें केली असून जैन धर्माची स्थापना महावीर ऊर्फ वर्तमान स्वामी यानें केलेली आहे, या उभयतांचाही जन्म राजकुलांतच झालेला असून ते परस्पर समकालीन आहेत. पाटणा शहराच्या उत्तरेस अजमासे सत्तावीस मैलांवर " बेसर " या नांवाचे हल्लीं एक लहान गांव आहे, त्या ठिकाणीं त्या काळांत 'वैसाली ' या नांवाचें मोठें शहर वसलेलें होतें; व तेथील राज्यकर्ता सिद्धार्थ याचा महावीर हा मुलगा होता. ( कांहीं ठिकाणीं सिद्धार्थ हा कुंडगपूर येथील राज्यकर्ता होता; असें लिहिलेलें