Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२ )

उत्तरेस हिंदुकुश पर्वतापासून दक्षिणेस मद्रासपर्यंतच्या विस्तीर्ण प्रदेशावर चाळीस वर्षे ( इ० सनापूर्वी २७२ ते २३२ पर्यंत ) राज्य केलें. त्यानें आपल्या कारकीर्दीत गोदावरी व कृष्णा या नद्यांमधील आंध्र प्रदेशाच्या राज्यकर्त्याला आपले सार्वभौमत्व मान्य करण्यास भाग पाडिलें होतें; तथापि दक्षिणेकडील पांड्य, चोल, केरलपुत्र व सत्यपुत्र ह्रीं राज्ये स्वतंत्रपणे नांदत राहिली होती. अशोक हा आपल्या साम्राज्याच्या मध्यवर्ती प्रांताचा कारभार स्वत:च पहात असे, आणि पूर्व, पश्चिम, दक्षिण व वायव्य दिशांकडील प्रांतांचा कारभार पाहाण्याकरिता त्यानें चार सुभेदारांची नेमणूक केली असून ते राजाज्ञेप्रमाणें कारभार चालवीत असत. अशोकानें शिला व स्तंभ यांवर अनेक आज्ञापत्रे खोदवून तो आपल्या साम्राज्यांत चोहोंकडे प्रसिद्ध केली, त्यांवरूनच त्याचें शहाणपण, व कर्तृत्व हीं निदर्शनास येतात. उदा- इरणार्थ, अशोकाचा शिलालेख नंबर २ व स्तंभलेख नंबर ७ यांत असा मजकूर आहे कीं, " मनुष्यप्राणी व मुकीं जनावरें यांनां छायासौख्य मिळत रहावें म्हणून मी रस्त्यांच्या बाजूंस दुतर्फा वडांची झाडे लावण्याची व्यवस्था केली आहे; व त्याप्रमाणेंच आवराया ही लाविल्या आहेत; अर्धा अर्धा कोसावर नव्या विहिरी खोदवून अनेक धर्मशाळाही मीं बांधावल्या आहेत व माणसे व जनावरें यांच्या उपयोगासाठीं मी ठिकठिकाणी पाणपोया ही ठेविलेल्या आहेत.” या शिवाय, गुरांकरिता दवाखाने, मनुष्याकरितां फुकट औषधालयें, वनस्पति वांटण्याचीं आलये, व शुश्रूषागृहें वगैरे लोकोपयुक्त संस्था अशोकानें निर्माण केल्या होत्या. या सर्व गोष्टींवरून, राजा अशोक यानें प्रजेच्या सुख- सोयींसाठीं किती काळजी घेतली होती, तत्परता दाखविली होती, व तजविजी केल्या होत्या, हे सहज निदर्शनास येतें.
 साम्राट् अशोक याच्या कारकीर्दीतील काळ हा एक प्रकारें धर्मक्रांतीचा काळ होय. असे म्हणतां येईल; या काळांत बौद्ध व जैन या दोन निरनिराळ्या धर्माचा उदय झाला. तथापि अशोकानें बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे त्याला राजाश्रय मिळून तो विशेष जोरांत आला, व त्याचा अतिशय प्रसार झाला. राजा अशोक यानेंदि या धर्माची वृद्धि करण्याकरिता विशेष परिश्रम घेतले; धर्मसंबंधींच्या राजाज्ञा खडक, खांब व शिला वगैरेंवर खोदवून त्या त्यानें-