Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आयलोक ते गेल्यावर त्यांना दस्यू आणि राक्षस या नांवानें संबोधित असत; इ० सनाच्या ७८ व्या वर्षी हिंदू लोक जावा येथे राहण्यास गेले, या बद्दल सर्व इतिहासकारांचे बहुतेक एक मत आहे; व सुमात्रा येथील वसाहत यापेक्षांदी जुनी असली पाहिजे, असे वाटतें. सुमित्र या नांवाचा हिंदू तेथे वसाहत करण्यास निघाला, तो कृष्णा नदीच्या मुखांपाशीं श्रीककुलं या नांवाचें शहर होतें तेथून होय. या वसाहतवाल्या लोकांना सुमात्रा येथील मूळच्या रहिवाशांकडून बरीच पीडा सोसावी लागली. चवथ्या शतकांत गुजराथ व सिंध या प्रांतामधील बौध्द धर्माचे काही लोक प्रथम सिलोन येथे जाऊन नंतर ते सुमात्राकडे गेले होते. हिंदू व बौध्द अशा दोन्हीं धर्माचे लोक या बेटांत स्नेहानें रहात असत; त्यांची एकमेकांशेजारी असलेली अनेक देवालये तेथे आढळतात. तेथील लोक आपण सूर्यवंशीय, किंवा चंद्रवंशीय आहों, असे अभिमानाने सांगतात. शिवाय,.. , आपण शिकंदराचे वंशज आहों, असे सांगणारे ही त्यांत कांहीं आहेत. मुमात्रा बेटाचा राज्यकारभार जावा बेटांतील राजाच्या हाती असे. मुमात्रा बेटांत ठिकठिकाण राम, शिव, सीता, भवानी, दुर्गा, महादेव, महेश, सुग्रीव, रुद्र, इत्यादि नांवांच्या हिंदू देवालयांचे अवशिष्ट भाग आजही हगोचर होत आहेत. त्याप्रमाणेंच असा ही उल्लेख आढळतो की, इ० सन ६०३ च्या सुमारास गुजराथेतील एका हिंदू राजाने आपल्या मुला बरोबर शेतकरी, कारागीर, लढाऊ लोक, वैद्य, व कारकून वगैरे मंडळी मिळून पांच हजार लोक देऊन त्यास जावा बेटांत पाठविलें होतें, व त्याप्रमाणें तो तिकडे गेलाही होता. वरील हकीकती वरून हिंदू लोकांनां नौका नयनाची कला पूर्णपणे अवगत होती, ते जलमार्गानें दूरदूरच्या प्रदेशांत प्रवास व व्यापार करीत होते, त्यांनी कित्येक प्रदेशांत वसाहती केल्या होत्या, आणि राज्यकर्तेही समुद्र मार्गाने चालणारा व्यापार व नौका नयन यांना उत्तेजन देत असून, प्रत्यक्ष आपल्या मुलासही अशा प्रवासास पाठवीत असत, वगैरे गोष्टी पूर्णपणे निदर्शनास येतात.
 हिंदूधर्म, व हिंदूधर्म रहस्य, या बाबतींत वर अगदी थोडक्यांतच उल्लेख आलेला असल्यामुळे, त्यासंबंधीही या ठिकाणी थोडेसे अधिक विवेचन करणे आवश्यक आहे. हिंदुस्थानांत, व हिंदूधर्मात अनेक प्रकारचे वाद, मतभेद, व मतमतांतरें, प्रचलित असून शिवाय निरनिराळे पंथ, सांप्रदाय, विधी, व आचार, अस्तित्वात आहेत. द्वैताद्वैतवाद पदार्थवाद. मायावाद, मिमांसा अथवा कर्म-