Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२०४ )


 राजकर्तव्यः – राजानें आपले कर्तव्य अत्यंत दक्षतेनें केले पाहिजे; त्याला विसावा फारच थोडा मिळणे शक्य आहे; देव, ब्राह्मण, क्षेत्र, अज्ञान, वृद्ध, स्त्रिया, दुःखी व निराश्रित, या सर्वांचे काम त्याने स्वतःच केलें पाहिजे; त्या प्रमाणेच धर्माविरुद्ध अथवा धर्मबाह्य आचरण करणाऱ्या लोकांवरही त्याने स्वतःच नजर ठेविली पाहिजे. राजानें, राज्यव्यवस्थेकरितां निरनिराळी अठरा खातीं निर्माण केली पाहिजेत, व त्या पैकी प्रत्येकांवर त्यानें एक एक वरिष्ठ अधिकारी नेमिला पाहिजे.
 राज्यनिधी:- राजाने आपल्या राज्याच्या निधीकडे विशेष काळजीनें लक्ष देत राहिले पाहिजे.
 शेतकी :- राजाने राज्याच्या शेतीकडे विशेष लक्ष देत राहिले पाहिजे. व शेतकी खात्यावर ही स्वतंत्र अधिकारी नेमिले पाहिजेत; या शेतकी खात्याच्या अधिकाऱ्याचे काम हल्लींच्या काळांतील मोजणीच्या व प्रतिबंदीच्या अधिकान्यांच्या कामाप्रमाणेच असून, बागाईत व जिराईत असे जमीनीचे दोन निरनिराळे प्रकार असत; व त्या त्या वर्गातील जमीनीच्या मगदुरा प्रमाणे सारा ठरविण्यांत येत असें; शेतसा-या शिवाय दुसरे ही अनेक कर असून शेताच्या उत्पन्ना पैकीं, राजानें चवथा भाग घ्यावा, असे ठरलेले असे; त्या प्रमाणेच लोकांच्या हिताकरितां जो मनुष्य राज्याच्या स्वाधीन पुष्कळ संपत्ति करील, त्यास राजानें मानाच्या पदव्या द्याव्या, असा नियम असे.
 शासन पद्धतिः – राजाचें काम दुष्टास शासन करणें हें आहे. या शिक्षा फार कडक असत; उदाहरणार्थ, आठ किंवा दहा पणांची- म्हणजे सहा किंवा साडेमात रुपयांची-चोरी केल्यास, त्यास देहांत शिक्षा देण्यात येत असे; शिवाय गुन्हेगाराकडून गुन्ह्याची कबूली करून घेण्याकरितां त्यास मारहाण करणे ही सशास्त्र मानण्यांत येत असे.
 वेतन पद्धतिः-- वरील बावर्ती शिवाय, या ग्रंथात सर्वांच्या वेतनाचे आंकडे दिलेले असून युवराजाचें वेतन दरसाल अट्टेचाळीस हजार रौण्यपण- एक पण म्हणजे अजमासें बारा आणे या हिशोबानें छत्तीस हजार रुपये व मजुराचे वेतन दरसाल साठ पण म्हणजे पंचेचाळीस रुपये ठरलेले होते; आणि साम्राट चंद्रगुप्ताची एकंदर राज्यव्यवस्था वरील पद्धतीस अनुसरून घडविलेली होती.