Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३४ )

स्थापन केलें होतें. महादेवाच्या मृत्यू नंतर, त्याचा पुतण्या व कृष्णराजाचा मुलगा रामचंद्र हा गादीवर आला. ( इ० सन १२७१ ) हा राजा ही मोठा धार्मिक व कीर्तिमान म्हणून प्रसिद्धीस पावला. महादेवराजा प्रमाणेंच हा ही धर्मशील व सन्मार्गगामी असून त्याने इ. सन १२७१ मध्ये सत्तावन ब्राह्मणास तीन गांव इनाम दिले होते; त्यावेळी, त्यांनीं व त्यांच्या वंशजांनी त्या गांवतच राहून त्या इनामाचा उपभोग घेतला पाहिजे, तीं गांवें गहाण टाकूं नयेत, त्या ठिकाणीं वेशांना राहूं देऊं नये, जुगार खेळू नये, हत्यारे वापरू नये, व त्यांनी आपला काळ अहर्निश ईश्वर चिंतनांत व सत्कर्मांत खर्च करीत रहावा, वगैरे शर्तीनें त्यांना या रामचंद्र राजाने बांधून घेतलें होतें. प्रसिद्ध हेमाद्री उर्फ हेमाडपंत या नांवाचा एक वत्स गोत्री यजुर्वेदी ब्राह्मण त्याचा मुख्य प्रधान होता. त्यानें धर्मशास्त्रावर एका ग्रंथ लिहिला असून " व्रतखंड " या नांवच्या ग्रंथांत यादव वंशाची सर्व हकीकत दिलेली आहे. " चतुवर्ग चिंतामणी " या नांवाच्या ग्रंथाचे चार भाग असून व्रतखंड हा त्याचा पहिला भाग आहे; आणि दानखंड, तीर्थखंड व मोक्षखंड हे त्याचे दुसरे तीन भाग आहेत; शिवाय परिशेष खंड म्हणून एक पांचवा भाग त्यास जोडिल आहे. प्रसिद्ध व विद्वान ग्रंथकार, व "मुक्ताफल" "हरिलाल", " मुग्ध- बोध" या नावाचे संस्कृतांत लिहिले प्राकृत भाषेचें व्याकरण, वगैरेंचा कर्ता बोपदेव हा त्याचा जोडीदार होता. हेमाद्री हा स्वत: मोठा हुषार व शीघ्र लेखक असून मोडी लिपी लिहिण्याची कला त्यानेच प्रथम निर्माण करून उप- योगांत आणण्यास सुरवात केली. शिवाय तो राजनीतिकुशल व व्यवहारज्ञ असून त्याने राज्यकारभारांतील निरनिराळ्या बाबतींची व्यवस्था, व्यवहारांतील शिरस्ते - मायने, व हिशोब जमाखर्च, वगैरेची पद्धती ठरवून दिली होती; सारांश हेमाद्री सारखा अलौकिक श्रीकरणाधीप अथवा मुख्य प्रधान महादेव व रामदेव या यादव राज्यकर्त्यांना लाभल्यामुळे त्यांच्या राज्याची अत्यंत भरभराट झाली.
 याच काळांत, म्हणजे रामदेव उर्फ रामचंद्र यादव या राज्यकर्त्याच्या कारकीर्दीत, महाराष्ट्रांतील प्रसिद्ध साधू ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानदेव हा निर्माण झाला. ज्ञानदेवाचा जन्म शके ११९७ श्रावण वद्य ८ स आळंदी येथे झाला. त्याच्या आईचें नांव रखमाबाई असे असून बापाचें नांव विठ्ठलपंत हें होतें. विठ्ठलपंत