पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1 काव्यात्म भावोत्कट नाट्य :- शिरवाडकरांनी ययाती उपाख्यानातून एक काव्यात्म, भावोत्कट नाट्य येथे साकार केले आहे. कचाचे सात्त्विक मन आणि मनाचे उदात्तीकरण प्रथमतःच या नाटकाच्या कथानकात प्रकर्षाने प्रकट झाले आहे. येथे कचाचे भव्य उदात्त दर्शन घडते. 'ययाति आणि देवयानी ' या नाटकातील कचाच्या खालील उद्गारातून याची साक्ष पटते. ' कच देवी माझ्याशी पतीचं नातं जोडावं अशी तुझी इच्छा होती पण ती मला सफल करता आली नाही कोठलही बंधन नसलेलं मैत्रीचं प्रेम अनेक बंधनात ओवलेल्या वैवाहिक प्रेमापेक्षा श्रेष्ठ, फार अधिक श्रेष्ठ आहे, असं मी मानतो. हे प्रेम मी तुला आणि फक्त तुलाच दिलं आहे. तू काहीही म्हटलंस तरी कच देवयानी हा समास काळालाही तोडता येणार नाही. तू हे नातं मनःपूर्वक स्वीकारलं असतंस तर ययातीबरोबर तुला सुखान संसार करता आला असता, पण तसं घडलं नाही. या अलौकिक प्रेमाची जात जाणली नाहीस! ' ( अंक ३ : पृष्ठ ५४ ) देवयानीवर एवढे उत्कट प्रेम करणारा हा कच आपल्या संजीवनी विद्येचा उपयोग, याच देवयानीच्या प्रेमासाठी तिचा शाप विफल व्हावा म्हणून मुद्दाम करतो. आपल्या प्रियेचा अपकर्ष येथे त्याला पाहवत नाही, कलात्मक न्यायात हे बसणारे आहे. ययाती पुरतेपणी शर्मिष्ठेकडे आकर्षिला गेला असून त्याच्यापासून तिला मुलेही झाली आहेत. हे समजल्यावर देवयानीच्या रागाचा भडका उडतो. सर्व प्रकारची विफलता पदरी पडल्याने तिला फक्त शाप देण्याचाच मार्ग खुला राहतो. म्हणूनच स्वतःच जीवनातील उद्वेगाने ती शाप देण्यास प्रवृत्त होते. पण 'कच एवढेसुद्धा समाधान तिला लागू देत नाही. स्वतच्या तपःसामर्थ्याने तो देवयानीचे सारे तेज हिरावून घेतो. ह्या घटना मूळ महाभारतात नाहीत. हे सारे घडते ते फक्त शिरवाडकरांच्या 'ययाति आणि देवयानी ' नाटकामध्येच. या फेरबदलाला शिरवाडकरांच्या कलात्मक जाणिवेचा कलावंताच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि नाट्यात्म सुसंगतीचा आधार आहे. ६७