पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दृष्टिकोन, वि. अं. खैरे यांचा समतावादी दृष्टिकोन आणि विद्याधर पुंडलिकांचा अस्तित्ववादी दृष्टिकोन येथे लक्षात येतो. या लेखकांनी उपरोक्त विविध दृष्टिकोनातून जरी महाभारताकडे पाहिले असले तरी आपण स्वीकारलेला तेवढाच महाभारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन नाही याचे प्रत्येकाने भान ठेवले आहे. शिवाय त्यात अन्य दृष्टिकोनही एकाच वेळी मिसळलेले आहेत. उदाहरणार्थ, इरावती कर्वे एकाच वेळी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि साहित्यिकांच्या कला- त्मक दृष्टिकोनातून महाभारताकडे पाहताना दिसतात. तर कृ प्र. खाडिलकर आपल्या साहित्यकृतीत राजकीय प्रचाराच्या आणि कलात्मक दृष्टिकोनातूनही पाहताना दिसतात. ८) कृष्ण, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, द्रौपदी, अश्वत्थामा, एकलव्य या महाभारतातील काही व्यक्तींची समृद्ध चित्रणे साहित्यात आढळत नाहीत. वस्तुतः यातील काही व्यक्तींना महाभारतात विशेष महत्त्व आहे. ज्या व्यक्तींच्या जीवनात शोकात्म अनुभूतीचा अभाव, आदर्श- वादाकडे कल, परतत्त्वाचा स्पर्श किंवा असामान्यत्व आढळते; त्यांचे चित्रण साहित्यात कमी प्रमाणात होणे स्वाभाविकच आहे. म्हणून कर्णाच्या तुलनने अर्जुन साहित्यिकांच्या जिव्हाळ्याचा विषय होत नाही. महाभारतातील अनेक कथा-उपकथा, घटना, प्रसंग आणि व्यक्तीच्याकडे मराठी साहित्यिकांचे लक्ष अजूनही वेधले गेलेले दिसत नाही. ९) मराठी साहित्यिकांनी ययाती उपाख्यानावर आपले लक्ष केंद्रित करून वैपुल्याने ललित साहित्याची निर्मिती केली आहे. त्या साहित्याची थोरवीही सिद्ध झालेली आहे. या एका काव्यात्म आणि कलात्म उपाख्यानाकडे संस्कृत साहित्यिकांचे लक्ष गेलेले आढळत नाही. निदान नामांकित साहित्यकृती निर्माण झालेली कोठेच आढळत नाही: तेव्हा महाभारतातील ययाती उपाख्यानाची काव्यानुकूलता हेरून दर्जेदार ललित साहित्याची निर्मिती करून महाभारतात मोलाची भर टाकल्याचे श्रेय मराठी प्रतिभेला द्यावे लागते. आजच्या संसारकथेचे प्रतिबिंब या कथेत उमटलेले आहे. ९६ ..