पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/78

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे७६     मराठी शब्दांचे उद्घाटन.

आहे. "आर्यावर्त " म्हणजे आर्यांच्या वसतीचे ठिकाण; विंध्य व हिमालय ह्या पर्वतांच्या ओळी ज्याच्या दक्षिणोत्तर मर्यादा आहेत, आणि सिंधु व ब्रह्मपुत्रा ह्या नद्या ज्याच्या पूर्वपश्चिम मर्यादा आहेत, असा जो देश त्याचा वाचक "आर्यावर्त " हा आहे व “आर्यावर्त " ह्याचा शब्दार्थ "आर्यांचा आवर्त " म्हणजे वसतिस्थान असा आहे. वर निर्दिष्ट केलेल्या प्रदेशांत आर्यांचे पुष्कळ दिवस वास्तव्य झाल्याकारणाने त्यास सहजच " आर्यावर्त" असे नांव प्राप्त झाले व पुढे आर्यलोक विंध्यपर्वतास ओलांडून दक्षिणेत येईतोंपर्यंत आर्यावर्त हें नांव, विंध्य व हिमालय, ह्यांच्या मधील प्रदेशास रूढ झाल्यामुळे त्याची व्याप्ति विंध्याच्या दक्षिणेकडील आर्यांच्या वसतिस्थानावर होऊ शकेना. आर्यावर्ताच्या दक्षिणेकडील प्रदेशास म्हणजे विंध्याच्या दक्षिणेकडील प्रदेशास " दक्षिणापथ " किंवा "दक्षिण " असे नांव प्राप्त झाले. तेव्हा " दक्षिणापथ" किंवा " दक्षिण " हीं नांवें आर्यावर्ताच्या अपेक्षेने दिलेली आहेत हे उघड आहे. आर्यलोक दक्षिणेकडून हिंदुस्तानांत प्रवेशून नंतर विंध्यपर्वताच्या पलीकडे गेले असते तर विंध्याच्या खालच्या प्रदेशास “आर्यावर्त" असे नांव पडून विंध्य व हिमालय यांच्या मध्यगामी प्रदेशास “उत्तरापथ" किंवा "उत्तर" असे नांव पडले असते.

 विंध्यपर्वतास किंवा निदान त्याच्या कांहीं भागास पारियात्र असे दुसरें एक नांव आहे. याचा अर्थ “ यात्रेची मर्यादा" असा होतो. ह्यावरून सुद्धा हेच सिद्ध होते की, आर्यलोकांचा विस्तार या पर्वताने पुष्कळ काळपर्यंत मर्यादित व कुंठित झाला होता.