पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/100

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे९८     मराठी शब्दांचे उद्घाटन.

पाहिला आहे काय? " मुलें म्हणालीं " होय, आम्ही पाहिला आहे." त्यावरून आम्ही विचारले “ तुम्ही कोणत्या रंगाचे पीतांबर पाहिले आहेत ?" मुलांनी उत्तर दिलें "तांबड्या रंगाचे," त्यावरून आम्हीं " तांबडा पीतांबर " हा प्रयोग शुद्ध आहे किंवा अशुद्ध आहे असे विचारलें ; कांहीं जीं खोगीरभरतीची मुलें होती त्यांणीं एकदम प्रयोग अशुद्ध असे उत्तर दिले, परंतु दोघां तीघां विचारी मुलांनी म्हटलें, "पीतांबर म्हणजे पिवळे वस्त्र असा जरी मूळचा अर्थ असला व पिवळेपणावरून जरी त्या वस्त्रास पीतांबर असें नांव पूर्वी पडले असले तरी आतां पीतांबर शब्द एक प्रकारचे रेशमी कापड इतकाच अर्थ दाखवितो आणि म्हणून तांबडा पीतांबर किंवा पिवळा पीतांबर किंवा दुसऱ्या कोणत्याही रंगाचा पीतांबर असू शकेल." आदल्या वर्षीच्या कोजागरी पौर्णिमेस देव्हाऱ्यावर किंवा दारावर लटकत सोडलेले जुने " नवें " काढून टाकून त्याचे जागी नवें " नवें " घालावयाचे वेळी मुलें जर म्हणाली, "आमचे एका वर्षाचे जुने नवे असून ते नव्या नव्यापेक्षा अधिक सुरेख दिसते," तर त्यांत त्यांची कांहीं चुकी होईल असे कोणास वाटावयाचें नाहीं. -

 वर आम्ही म्हटले आहे कीं असत्यमूलक शब्दांस व प्रयोगांस भाषेतून हांकून लावतां यावयाचें नाहीं, व हांकून लावणे इष्ट नाहीं. शब्द भाषेमध्ये एकदा रूढ झाले म्हणजे ते भाषेच्या जीविताची अंगें होऊन जातात व त्या अंगांचा छेद करणे म्हणजे भाषेच्या जीवितास धक्का पोंचविण्यासारखे आहे. शब्द एकदा भाषेच्या जीविताचीं अंगे ह्या स्थितीस जाऊन पोंचले म्हणजे ते मनुष्याच्या अधिकाराबाहेर जातात,