पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘भरली घागर' (१९५१) आणि ‘बहिणाबाईंची गाणी' (१९५२) यांनी स्त्रीवादी काव्याला नवे परिमाण प्राप्त करून दिले ते आशय, विषय, भाषा, शैली, शिल्प सर्व अंगांनी.
 वरील कवितेचा विकास झाला मुख्यतः १९५० नंतरच्या पंचवीस वर्षांत (१९७५ पर्यंत). इंदिरा संत, पद्मा गोळे, संजीवनी मराठे, शांता शेळके, शिरीष पै, अनुराधा पोतदार, प्रभा गणोरकर या मराठीतील साठोत्तर कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. संजीवनी मराठेचा ‘चंद्रफूल' (१९७१), इंदिरा संतांचे 'शेला' (१९५१), 'मेंदी' (१९५०), ‘मृगजळ' (१९५७), रंगबावरी' (१९६४), ‘बाहुल्या' (१९७२), पद्मा गोळेचे ‘नीहार' (१९५४), ‘स्वप्नजा' (१९६२), आकाशवेडी' (१९६८), शांता शेळकेंचे ‘रूपसी' (१९५६), ‘गोंदण' (१९७५), शिरीष पैंचे ‘एकतारी' (१९६५) आणि 'एका पावसाळ्यात' (१९६९), अनुराधा पोतदार ‘आवर्त' (१९६९) तर प्रभा गणोरकरांचा ‘व्यतीत' (१९७४) अशा संग्रहातून दिसणारी मराठी स्त्रीवादी कविता स्त्रियांची तरल संवेदनशीलता प्रतिबिंबित करते. उत्कट क्षण, निसर्गसौंदर्य, स्त्रीचं भावविश्व व्यक्त करणारी ही कविता कलात्मक पातळीवर उच्च प्रतीची ठरते. सामाजिक जाणिवांचं प्रगल्भ भान, स्त्रीवादी चिंतन म्हणून या काळच्या कवितांचं असाधारण महत्त्व आहे. ही कविता रोमँटिक काव्यप्रवाहाशी जुळणारी. परंपरा आणि आधुनिकतेच्या कात्रीत सापडलेली ही कविता आत्मलक्ष्मी म्हणून वाचकांच्या काळजाचा ठाव घेते. रंजक व कलात्मक तरी बोधप्रद ठरणारी ही कविता.

 आणीबाणीनंतर ते विसाव्या शतकाचा अंत असा १९७५ ते २००० पर्यंतचा स्त्रीवादी कवितेचा काळ म्हणजे कवयित्रीच्या दृष्टीने अनेक पिढ्या, विविध वयोगट, विचारवैचित्र्य, वृत्तिवैविध्याचा काळ. नव्या-जुन्याचं काव्य बनून राहिलेल्या या काळात एकीकडे इंदिरा संत, शांता शेळके, शिरीष पै, पद्मा गोळे, संजीवनी मराठे लिहिताना दिसतात, तर दुसरीकडे प्रभा गणोरकर, रजनी परुळेकर, वासंती मुजुमदार, मल्लिका अमर शेख, तर निकट वर्तमानातील नीरजा, आसावरी काकडे, अरुणा ढेरे, प्रज्ञा लोखंडे, प्रज्ञा दया पवार, अश्विनी धोंगडे, प्रभृती कवयित्री ही. 'गर्भरेशीम' या इंदिरा संतांच्या सन १९८२ च्या कथासंग्रहास साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळवून देणारा काळ म्हणूनही याचं महत्त्व आहे. शांता शेळके- ‘गोंदण' (१९७५), अनुराधा पोतदार- ‘कॅक्टस फ्लॉवर' (१९७९), शिरीष पै- 'माझे हायकू' (१९८६), संजीवनी मराठे -‘आत्मीय' (१९७४), प्रज्ञा लोखंडे-‘अंतस्थ' (१९९३), अरुणा ढेरे-‘निरंजन' (१९९४), आसावरी काकडे-‘लाहो' (१९९५) अशा

मराठी वंचित साहित्य/६३