पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संग्रहांतून या काळची कविता प्रातिनिधिक रूपाने अभ्यासता येणं शक्य आहे. या काळातील अधिकांश कवयित्री मध्यमवर्गीय सुशिक्षित. त्यांचे अनुभवविश्व स्वपरिघ, भावुकता, हळवेपणा हा त्यांच्या काव्याचा स्थायीभाव दिसतो. विषयांच्या तोचतोपणाचा दोष दिसतो. प्रभा गणोरकरांच्याच शब्दांत सांगायचं तर "मराठी कवितेच्या आकाशात असंख्य तारे दिसावेत पण स्वत:चे तेज असलेली लखलखीत नक्षत्रे मोजकीच असावीत, असे हे चित्र आहे."
 एकोणीसशे नव्वद नंतरच्या व वर्तमान शतकाच्या काळात प्रज्ञा दया पवारांचा ‘मी भिडवू पाहातेय समग्राशी डोळा'सारखा काव्यसंग्रह स्त्रीसंवेदनेचा एक वेगळा अवकाश निर्मितो.

 समग्रतः मराठी स्त्रीवादी साहित्य पुरुषी वर्चस्वाला सर्व बाजूंनी हादरवताना दिसते. त्यात स्त्रियांचे भावविश्व आहे तसेच शरीरनिष्ठ अनुभवही. हेच खरे तर या साहित्याचे ऊर्जास्त्रोत होय. स्त्रियांच्या बदलत्या मानसिकतेचे आणि नवनव्या आकांक्षांचे प्रतिबिंब त्यात आहे. हे साहित्य स्त्री-अस्मितेचा शोध आहे. प्रारंभी रडणारी, कुढणारी स्त्री आता अस्मितेच्या सार्थ अभिमानात वावरते आहे. स्त्री-भावनांचे उदारीकरण नव्या स्त्रीस अधिक स्वतंत्र व स्वप्रज्ञ करते आहे. मुक्तीनंतरचे तिच्या साहित्यातील सार्थ हास्य हा या साहित्याला गवसलेला एक सामाजिक नजराणा आहे. ते स्त्रीचे नव्हे तर माणूसपणाचे साहित्य आहे.

मराठी वंचित साहित्य/६४