पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करीत राहतो. याचं कारण मराठी साहित्य इतिहासकार, समीक्षक, कोशकारांचं संकुचित व साचेबंद जीवन, जगणं आणि मर्यादित जीवनानुभव. त्याचा परीघ रुंदावून आपण मराठी वंचित साहित्याचा धांडोळा घ्यायला हवा. ती एकविसाव्या शतकाची मनुष्यकेंद्री व्यापकता व विकासशीलता ठरेल. आज ते आवश्यकच नाही तर अनिवार्य झालं आहे.
 "Social deprivation is the reduction or prevention of culturally normal interaction between an individual and the rest of society. This social deprivation is included in a broad network of created factor that contribute to social exclusion. These factors include mental illness, poverty, poor, education, and low socioeconomic status."

 विकिपीडियावरील ही सामाजिक वंचिततेची व्याख्या लक्षात घेता आपणास लक्षात येईल की, वंचितता निसर्गापेक्षा मनुष्यनिर्मित अधिक असते. सांस्कृतिक जीवनात समाजातील वेगवेगळ्या अल्पसंख्य, वंचित समुदायांना बहुसंख्य समाज कधी व्यक्तिशः तर कधी सामूहिकपणे वंचित, बहिष्कृत, पीडित, ग्रस्त करीत असतो. सामाजिक, आर्थिक, पारंपरिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, शारीरिक, प्रथाविषयक जुन्या-पुराण्या धारणांचा बळी ठरलेला शोषित वर्ग नेहमीच हक्क, अधिकार, संधी, सुविधांपासून वंचित राहत आला आहे. जात, धर्म, लिंग भेदांइतकीच गंभीर वंचितता प्रथा, परंपरा, धारणांची राहत आली आहे. जो वंचित वर्ग संघटित होता त्याचे साहित्यप्रवाह इतिहासात ठळकपणे नोंदले गेले असले तरी त्यांच्याइतकेच अन्याय, अत्याचार, उपेक्षा, बहिष्काराचा बळी ठरलेला असंघटित, विखुरलेला, विस्कटलेला, दबलेला जो वर्ग आहे त्याचीही नोंद घेऊन मराठी वंचित साहित्याचे आकलन आपण करून घेतले आणि आजवर साहित्य इतिहासातील तुटलेले, उपेक्षित, अनुल्लेखित दुवे जर आपण जोडू शकलो तर समग्रतः मराठी साहित्याचा, भारतीय साहित्याच्या पार्श्वभूमीवर दर्जा उंचावायला व साहित्यापुढील आव्हानांचे वस्तुनिष्ठ आकलन होण्यास साहाय्य होईल असे वाटल्यावरून या लेखात मराठी वंचित साहित्याचा परीघ रुंदावून तो सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जागतिकीकरणानं Subaltern History ला महत्त्व आले आहे. आर्थिक उदारीकरणाबरोबर आकलनाचे रुंदीकरण म्हणजे खरे उदारीकरण. उत्तर आधुनिकतेच्या निकषावर ऐतिहासिक परिशीलन व्हायचे तर प्रस्थापित पद्धतीस छेद देणे ओघाने आलेच. तीच खरी वस्तुनिष्ठता, नाही का?

मराठी वंचित साहित्य/३२