पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३. मराठी प्राचीन साहित्य : वंचितांप्रती कळवळा
 प्राचीन मराठी साहित्यात महानुभावपंथीय साहित्य, संतसाहित्य, पंडितशाहिरी काव्य, बखर वाङ्मय यांचा अंतर्भाव होतो. त्यातील अधिकांश साहित्य पद्यरूप आहे. मराठी गद्यरूपांचा आरंभिक चेहरा म्हणून या काळाचे महत्त्व आहे. विशेषत: संतकाव्यात तत्कालीन जातिप्रथा, जातिभेदांवर आधारित मंदिर प्रवेश-अप्रवेश, प्रथांवर आधारित अत्याचार यांची वर्णने आढळतात. मराठी संतांनी या सर्व दुष्ट प्रथा, चालीरीती, भेद मोडावेत असा प्रयत्न आपल्या काव्यातून केलेला आढळतो.
 अवघे संतजन आमुचे सांगाती।
 जेवू एका पंक्ती सरिसे आम्ही।।
 म्हणणारे संत नामदेव ज्ञातिहीन मानल्या जाणा-या निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, ज्ञानेश्वरांना ‘जनमित्र' संबोधून ‘जीवलगू' म्हणतात. कर्मठपणाची पंगुता ज्ञानेश्वर, तुकारामांनी ज्या स्पष्ट शब्दांत आपल्या अभंग, ओव्यांतून धिक्कारल्याचे दिसते, ती त्यांची वंचितांप्रती असलेली केवळ सहानुभूती नसून ती वंचितांचे विश्व विकसित करण्याचीच धडपड होय. ज्ञानेश्वरांचे 'पसायदान', तुकारामांची 'गाथा', रामदासांचा 'दासबोध' भक्तीच्या माध्यमातून केलेला मनुष्यधर्माचाच प्रचार होय. ‘विज्ञानी उमज दावुनियां' म्हणणारे तुकाराम पुरोगामीच. ‘वर्णविहिताचे लक्षण' निर्धारित करण्याची मनीषा बाळगणारे ज्ञानेश्वर चातुर्वर्ण्यव्यवस्थेला शह देऊ इच्छितात.
 दु:ख दुसन्याचे जाणावे । ऐकोन तरी वाटून घ्यावे।
 बरे वाईट सोसावे । समुदायाचे।।

 असे सुचवणारे सतं रामदास सामूहिक हिताची तळमळ व्यक्त करतात. ‘म्लानता कधिं न यो सुमनातें ।' अशी मनीषा बाळगणारे वामन पंडित आपल्या वेच्यांतून ‘शोकांत हृदयाची प्रचिती देतात. स्त्रिया स्व-धर्म असती कीं।' असे ‘नारदनीति'मध्ये सांगणारे मुक्तेश्वर स्त्रीच्या 'स्व'चे समर्थक होतात. तसेच मोरोपंत आपल्या आर्यांतून ‘जो जो वांछिल जे जे ते द्यावे' अशी प्रार्थना करून एका व्यापक सद्धर्माचे निरूपण करतात. या नि अशा प्राचीन मराठी काव्यातून वंचितांप्रती असलेला कळवळा म्हणजे देव, अध्यात्म, कर्मकांडास छेद देत मानवाच्या व्यापक समाजहिताची पेरणीच म्हणावी लागेल. याच पायावर मराठी अर्वाचीन साहित्याचा डोलारा उभा आहे. त्याचे नैतिक व मूल्याधिष्ठित अधिष्ठानही प्राचीन साहित्यच आहे, हे विसरता येणार नाही.

मराठी वंचित साहित्य/३३