पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अपरोक्षपणे त्यांच्या काव्यात आढळणारा खंत, खेद या वंचित साहित्याच्या पाऊलखुणा होत. त्यामुळे मराठी साहित्याच्या प्रारंभापासूनच आपणास वंचित साहित्यनिर्मितीची परंपरा दिसून येते. गेली सुमारे सातशे वर्षे मराठी भाषा, साहित्य, संस्कृती नित्य विकसित होत आली तरी वंचनामुक्त समाज आपण निर्माण करू शकलो नाही, हे वास्तव हाती उरतंच. त्यामुळे कालपरत्वे मराठी वंचित साहित्य विकसित होत राहिलं तरी ते मानवी व्यथा, वेदना, मुक्तीचा स्वर बुलंद करू शकलं नाही याची नोंद घ्यायला हवी.


२. वंचित : व्युत्पत्ती, व्याख्या आणि व्याप्ती
 मराठीत ‘वंचित' शब्द उपेक्षित, अंतरलेला, बहिष्कृत, शोषित, गरीब, निराधार, पीडित, ग्रस्त, गरजू अशा व्यापक अर्थांनी वापरला जातो. हा संस्कृत भाषेतील मूळ शब्द. त्याची व्युत्पत्ती वंच् + निय + कत् सांगितली जाते. त्याचा अर्थ कमतरता असलेला, संकटग्रस्त, नाडलेला असा होतो. इंग्रजीत स्थूलपणे याचा समानार्थी शब्द सांगायचा झाला तर 'Deprived म्हणता येईल. इंग्रजीत 'Deprived' शब्दाचे तीस समानार्थी शब्द आढळतात. हे शब्दवैविध्यच समाजातील वंचिततेची व्यापकता व व्याप्ती सिद्ध करतेDisadvanteged, Unprivileged, Poverty-sticken, Poor, Destitute, Needy, Depressed, Distressed, Forlorn, Penurious, Impecunious, Necessitous, Lacking, Bereft, In-want, In-need, Denuded, Down at heel, Baggared, Broke, Improverished, Indigent, Penniless, Insolvent, Pinched, Reduced, Straitened, Displaced, Disposed, Hard-up, etc. यांचे मराठी पर्यायी शब्दही तेच सांगतात.

 वंचितता ही बहुविध असते. जात, धर्म, लिंग, परंपरा, प्रथा, विचार, पंथ, सामाजिक, आर्थिक, शारीरिक, सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक स्थिती आणि स्थित्यंतरांतून समाजात विविध प्रकारच्या वंचितता दिसून येतात. त्यातून गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, सवर्ण-अवर्ण, स्त्री-पुरुष, तृतीयपंथी, शहरी-ग्रामीण, दलित, आदिवासी, भटके, कुष्ठपीडित, देवदासी, परित्यक्त, विधवा, अनाथ, अपंग, बंदी, अंध, मतिमंद, मूकबधिर, एड्सग्रस्त, धरणग्रस्त, सेझग्रस्त, वेश्या, कुमारी माता, बलात्कारित, घटस्फोटित, वृद्ध, मजूर, भूमिहीन, विस्थापित, कर्जबाजारी, दुभंगलेली कुटुंबे, माणसे, बालके, स्त्रिया असं वंचितांचं व्यापक विश्व मराठी साहित्यात प्रतिबिंबित असताना, आपण स्थूलपणे दलित, ग्रामीण, स्त्री, आदिवासी, अशा छोट्या वर्तुळात विचार

मराठी वंचित साहित्य/३१