पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मराठी वंचित साहित्य


 १. पार्श्वभूमी :
 जगातील सर्व भाषा आणि साहित्याचा अभ्यास करीत असताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, भाषा व साहित्याची आदिरूपे मौखिक होती. प्रथम बोली अस्तित्वात येतात. तिला कालौघात प्रमाणरूप प्राप्त होते. ती लिपिबद्ध होते व भाषा बनते. साहित्याचंही असंच असतं. प्रथम वाङ्मय अस्तित्वात येतं ते लोकसाहित्याच्या रूपात. ते मौखिक असतं. एका पिढीकडून दुस-या पिढीकडे मौखित पाठांतराच्या रूपात होतं. कालौघात ते लिपीबद्ध होतं. भाषेच्या प्रमाणरूपानुसार लिखित साहित्यभाषाही प्रमाणित होत राहते. मराठी साहित्याची आद्यरूपे आपणास गोपगीते, ओव्या, अभंग, शाहिरी, कहाण्या, आख्यायिका अशा रूपात आढळतात. मराठी लिखित साहित्य अकराव्या शतकापासून आढळतं. “ज्योतिषरत्नमाला', मुकुंदराजांचा ‘विवेकसिंधु', म्हाइंभट्टांचे 'लीळाचरित्र' हे मराठी साहित्याचे आदिग्रंथ मानले जात असले तरी ‘लीळाचरित्र' (इ. स. सुमारे १२७८) मध्ये मराठी गद्याच्या प्रारंभिक खुणा दिसून येत असल्याने त्यास आदिग्रंथाचा मान दिला जातो.

 महानुभाव पंथाच्या वाङ्मयात कथा, वर्णने, आठवणी आहेत. ती गद्य आणि पद्य दोन्ही शैलींत लिहिली गेली आहेत. त्यांना येणा-या संतसाहित्यात ज्ञानेश्वर व त्यांचे निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई भाऊ-बहीण यांचे जीवन मराठी वंचित साहित्याच्या पूर्वखुणा म्हणता येतील. या कुटुंबाचे प्रथांचे बळी ठरणे, बहिष्करण ही सामाजिक वंचितताच! नामदेव, चोखामेळा, नरहरी सोनार, विसोबा खेचर, सावता माळी, जनाबाई यांचं जीवनही वंचितता सांगून जातं. जातीच्या आधारे मंदिरप्रवेश न मिळणेसारखे सहन केलेले अत्याचार व परोक्ष-

मराठी वंचित साहित्य/३०