पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रांतिक, अल्पसंख्य, वंचित असे गट अस्मिता व अस्तित्व संघर्ष घेऊन उभे ठाकल्याचे चित्र आहे. वर्तमान सामाजिक संघर्ष व तणावातून वाट काढायची तर समाजातील सर्व प्रकारच्या वंचित, बहिष्कृत समाजाबद्दल समावेशनसंबंधी सहिष्णुता असणे आवश्यक आहे. घटनेच्या चौकटीत राहूनही हे करणे शक्य आहे; पण त्यासाठी ज्या राजकीय इच्छाशक्तीची, उदारतेची, प्रसंगी पुरोगामी निर्णय घेण्याची जी धमक सरकारमध्ये लागते, तिचा सर्वथा अभाव दिसून येतो. अशा स्थितीत समाजवर्गानेच पुढाकार घेऊन परस्पर सहिष्णुताभाव निर्माण करणे व तशी कृती करणे आवश्यक होऊन जाते. वर्तमान भारतीय सामाजिक प्रश्न छोट्या-छोट्या गटांचे असले तरी सामाजिक एकतेसंदर्भात सर्वांच्या अस्तित्वाचा आदर करून त्यांना विकासाची समान संधी देणे ही काळाची गरज आहे. अव्यक्त अशांततेच्या ज्वालामुखीवर वसलेला वंचित समाज सदासर्वकाळ दुर्लक्ष सोसत राहील अशा भ्रमात भविष्याच्या संदर्भात सामाजिक फसगत होऊ शकते. ती होऊ द्यायची नसेल तर सर्व प्रकारच्या वंचित समुदायाच्या समावेशनाचे उदार धोरणच यावर सामाजिक उपाय होय.

मराठी वंचित साहित्य/२९