पान:मराठी रंगभुमी.djvu/70

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
मराठी रंगभूमि.

'दुर्गा' नाटक आले होते, व तें दुसऱ्या प्रतीचे ठरून त्यासही थोडेबहुत बक्षिस दिले. कॉलेजमध्ये स्त्रीवेष घेणारी मुलें फार मिळत नाहीत, तेव्हां होतां होईल तों बक्षिसाकरितां येणा-या नाटकांत स्त्रियांची पात्र कमी असावीत, तसेंच नाटकाचा प्रयोग तीन तासांच्या आत आटपावा वगैरे काही अटी होत्या, त्या अटींना अन- सरूनच वरील नाटकांस बक्षिसे देण्यांत आली होती. 'गुणोत्कर्षास' पहिले बक्षिस कां व 'दुर्गा' नाटकास दुसरें कां, यासंबंधानें हकीकत कळते ती अशी की, योग्यतेसंबंधाने दुर्गा नाटक गुणोत्कर्षापेक्षा कमी आहे असें नाही, तर गुणोत्कर्षाचे संविधानक ऐतिहासिक असून पूर्वजांच्या अभिमानास्तव कोल्हापुरच्या रंगभूमीवर, व विशेषतः राजाराम कॉलेजच्या रंगभूमीवर करण्यास तें ठीक होतें. दुर्गेचे संविधानक ऐतिहासिक नाही. शिवाय गुणोत्कर्ष हे आनंदपर्यवसायी आहे, दुर्गा तसे नाहीं; व मंडळीला आनंदपर्यवसायी नाटक करण्याचे आवडल्यामुळे त्यांनी तेंच पसंत केलें. असो; पूर्वी जी नाटके या कॉलेजमध्ये झाली त्यांपैकी 'शशिकला आणि रत्नपाल' (रोमिओ अँड ज्युलिएट ) या नाटकांत मि. जोशी या नांवाच्या एका विद्यार्थ्याने शाश- कलेचे काम फारच अप्रतिम केले होते. जोशी याचा आवाजही चांगला असल्यामुळे त्याने आपल्या गाण्या- नेही प्रेक्षकांचे मनोरंजन फार चांगलें केलें होतें,