पान:मराठी रंगभुमी.djvu/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बेलगामी वर्तन व फाजीलपणा यांतच उत्तरोत्तर आधिक सरशी करण्याकडे जी प्रवृत्ति होत चालली आहे ती नाहीशी होईल असें आह्मांस वाटते. तसेच आपल्या उत्तम पदास जाऊन पोहोचलेल्या गायनकलेचे मातरें न होतां तिचा जीर्णोद्धार होईल, नाटकमंडळ्यांची योग्यता वाढेल, आणि त्यांच्या द्वारे लोकांत शिक्षणाचा प्रसार होऊ लागेल यांत संशय नाहीं.

 रा० कुलकर्णी यांच्या मते नाटकांत स्त्रियांनी भूमिका घेणे आपल्या समाजाच्या स्थितीचा विचार केला असतां बिलकुल इष्ट नाही. परंतु नटवर्गात केवळ स्त्रियांस उत्तम प्रकारें साधण्यासारख्या ज्या भूमिका आहेत, त्यांची बतावणी करण्यास पुरुषांनी कितीही प्रयत्न केले तरी ती साधत नाही. हल्लीच्या चांगल्या नावाजलेल्या नाटककंपन्यांतही स्त्रियांची भूमिका घेणाऱ्या पात्रांकडे पाहिले तर त्यांच्या वेषाने त्यांची जाति झांकली जात नाही असेंच अनुभवास येते. लहान वयाच्या मुलांनी स्त्रीवेष घेतला तर इतकी उघडीक पडत नाही हे खरे; पण दिवसानुदिवस नटाचे काम इतके अवघड होत चालले आहे की, अल्प- वयाच्या अनभ्यस्त नटास आपल्या कामाची उठावणी होत नाहीं यामुळे चाळीस वर्षांच्या वयाच्या पुरुषांसही मिशांची रजा घेऊन स्त्रीवेष घेणे भाग पडतें. पात्रांत कौशल्य येण्यापूर्वीच त्याच्या शरीराची ठेवण, चर्या व मार्दव स्त्रीवेषास प्रतिकूल होतात, यामुळे रसभंग होतो. आपणापुढे उभी असलेली नायिका आपल्या दृग्प्रत्ययाविरुद्ध स्त्रीच आहे, मिशा काढिलेला, किंवा क्वचित् प्रसंगी त्यांची फारकत करण्याच्या नाखुषीने त्यावरच रंग चढविलेला एखादा बाप्या नाही, अशी मनाची समजूत करून घेण्यास पराकाष्ठेचें जड जातें, किंबहुना अशक्य असतें. यामुळे आपल्यापुढे चाललेल्या प्रयोगांत प्रेक्षकांस भान विसरून तल्लीन होऊन जातां येत नाही. पुरुषांची कामें स्त्रियांनी किंवा स्त्रियांची पुरुषांनी करण्यांत नाटकाच्या दृष्टीने विशेष सौंदर्य अथवा चमत्कृति आहे असे आह्मांस वाटत नाही. नाटकांत स्त्रियांचे सोंग बेमालूम घेणे, एवढाच हेतु असतो असें नाहीं, तर कथानकांतील निरनिराळ्या प्रसंगीं