पान:मराठी रंगभुमी.djvu/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनोविकारांचा योग्य रीतीने ठसा उठविणें हें मुख्य कार्य असते. अर्थात स्त्रीवेषधारी पुरुषास स्त्रीत्वाची बतावणी करणे भाग असल्यामुळे हे कार्य दुप्पट कठीण होते. यापेक्षा स्त्रियांनीच आपली कामें करण्याचा प्रयत्न केला तर फक्त प्रसंगोचित अभिनय कसा करावा एवढेच त्यांनी पाहिले ह्मणजे झाले. नाटकांत येणारे प्रसंग स्त्रीपुरुषांच्या मिश्र नाट्यवर्गास अभिनय करून दाखविण्यासारखे सभ्यतेस सोडून नसले, म्हणजे नटवर्गास अथवा प्रेक्षकांस ब्रीडोत्पादक असे त्यांत कांहींच उरणार नाही. नाटक हें संसाराचे चित्र आहे अशी वर्णनात्मक व्याख्या करितात. संसारांतील कृत्ये स्त्रीपुरुषमय आहेत, तर रंगभूमीवरचे त्याचे प्रतिबिंब स्त्रीवर्जित असावें हेंही सयुक्तिक दिसत नाही. आतां नाटकांत सोंगें घेणाऱ्या पुरुषांप्रमाणेच स्त्रियाही नीतीसंबंधाने कित्ता घेण्यासारख्या मिळणे दुरापास्त आहे, आणि अशा प्रकारे उत्पन्न झालेल्या सान्निध्याने नाटककंपन्यांभोवती असलेले मोहाचे जाळें जास्त घट्ट केल्याप्रमाणे होणार आहे, असा आक्षेप यावर येण्यासारखा आहे; परंतु त्याचा प्रतिकार करण्यासाठी नाट्यसृष्टींतून स्त्रीजात एकदम बहिष्कृत करण्यापेक्षा थोडे कमी खडतर असे उपाय योजून यत्न केला पाहिजे. हे उपाय कोणते याचे नुसते दिग्दर्शन देखील या अल्प लेखांत यथोचित करणे अशक्य आहे; तथापि असे उपाय योजणे शक्य आहे, येवढेच येथे सांगतों. नाटकमंडळ्यांस मोह घालण्यास हल्ली आपल्या नाटककंपन्यांत स्त्रिया नाहीत, तथापि या अभावामुळे नीतिदृष्टया त्यांना फार फायदा झाला आहे, असे कोणी ह्मणणार नाही. केवळ रंगभूमीसंबंधी विचार केला तर आपल्या नाटकमंडळ्यांत स्त्रियांची भूमिका घेण्यास स्त्रिया नाहीत, ही मोठी उणीव आहे असें आह्मांस वाटते. असो; ग्रंथकर्त्याचा व आमचा या एका बाबतीत थोडा मतभेद असला तरी त्यांनी केलेल्या इतर सूचना आह्मांस फार मोलवान व महत्वाच्या वाटतात. यांत आभिनय कसा असावा, पात्रांनी अनुरूप नेपथ्य करण्यांत ऐतिहासिक माहिती मिळविणे किती आवश्यक आहे इत्यादि मुद्यांचा फारसा विचार केलेला दिसत नाहीत. तसेंच नाटकाच्या रचनेविषयीही फारसे खोल विचार यांत नाहीत. तथापि प्रत्येक नटाने या पुस्तकाचे