पान:मराठी रंगभुमी.djvu/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४
मराठी रंगभूमि.

कचेरी व प्रत्येक पक्षाकडील स्त्रियांची एक कचेरी अशा कचेऱ्या होत व त्यांतून उलटपक्षाचा पाडाव व नाश करून आपण कसा जय मिळवावा याचीच बहुधा वाटाघाट होई. ही वाटाघाट चालतांना एका पात्रानें दुस-या पात्रास मधुन मधून ‘ सांगतों ऐक' ह्मणावें व सूत्रधारानें पद्य म्हणून त्यांतून त्याचा मनोभाव व्यक्त करावा. देववेष घेणारे व राक्षसवेष घेणारे यांचीं भाषणें पूर्वीच सगळीं तयार केलीं असत असें नाहीं; कांहींकांचीं पूर्वी तयार करीत व कांहीं कथाभाग लक्षांत ठेवून समयस्फूर्तीवर वेळ मारून नेत. देवांचीं कामें करणारे इसम आपापल्या परीनें भाषणांत आवेश व वीरश्री दाखवीत; व राक्षसांचीं सोंगें करणारे इसमही आरडून ओरडून व राळाच्या उजेडांत तरवारीच्या फ्रेंका करून वीरश्री व्यक्त करीत. ख्रियांच्या भाषणांत साधारणपणें शृंगार व करुण हे दोन मुख्य रस असत. पैकी श्रृंगारापेक्षा करुण रस जास्त असून ' शिव शिव हे शंकरा ” इ० दीर्घ स्वराचीं वाक्यें उच्चारून व धरणीवर आंग टाकून त्याची पूर्तता होई. याही वेळीं शोक चालला असतां सूत्रधारानें पद्यांतून त्यांचें मनोगत व्यक्त करावें. असा हा नाटकाचा प्रयोग चालला असतां पात्रांना विश्रांती देणें, त्यांना पद्यांतून भाषणें सुचविणें, वगैरे कामें सूत्रधाराकडे असल्यामुळे त्याला'आरंभापासून अखेरपर्यंत साथीदारांसह गायनवादनाचें साहित्य घेऊन सज्ज रहावें लागत असे.'