पान:मराठी रंगभुमी.djvu/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५
भाग १ ला.

विदूषकासही पाहिल्यापासून शेवटपर्यंत काम असे. त्यावेळीं आतांप्रमाणें पडद्याच्या आंत देखाव्याची किंवा स्थलविशेषाची मांडणी करीत नसून पडदेही पुष्कळ नसत. पुढच्या एका पडद्यावर काम चाले, व तो कडया लावून दोरीनें ओढून घेतां येण्यासारखा केलेला असे. हा पडदा एकदां सारला कीं, नाटक संपेपर्यंत बहुधा पुढे ओढीत नसत. रंगभूमीवर कचेरीचा थाट ह्मणजे चार दोन खुर्च्या ओळीनें घातल्या म्हणजे झाला. देवांची कचेरी याच खुर्च्यावर; ती आटपली कीं, राक्षसांची कचेरी याच खुर्च्यावर व राक्षसांची आटपली कीं, स्त्रियांची कचेरी याच खुर्च्यावर ! याप्रमाणें सगळ्या कवेन्या वगेरे एकाच बैठकीवर बहुतकरून होत, या सर्व प्रसंगीं विदूषकास तेथें मांडणी करण्याकरितां किंवा कांहीं लागलें सवरलें तर तें देण्याकरितां उमें रहावें लागत असे; व देवांस, राक्षसांस किंवा स्त्रियांस हरएक प्रसंगीं विदूषक म्हणजे एक तोंडीलावणेंच होई. अर्थात् कोणास कांहीं आठवेनासें झालें कीं, त्यानें विदूषकास कांहीं तरी प्रश्न करावा; एकाद्या पात्रास आंतून यावयास उशीर झाला कीं, बाहेर असलेल्या पात्रानें विदूषकाशीं थट्टा आरंभावी; व स्त्रियांच्या कानांतला अगर नाकांतला एखादा दागिना पडला कीं, तो विदूषकानें उचलून द्यावा. याप्रमाणें रंगभूमीवर पडल तें काम विदूषकास करावें लागे.