Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/231

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१९७
भाग ३ रा.

अलीकडचे शिवाजी, तुकाराम, अहिल्याबाई इत्यादि व्यक्तींचीं सोंगें घेऊन रंगभूमीवर येणारे नट जर सद्वर्तनाचे किंवा शुद्धाचरणाचे नसतील तर त्या व्यक्तींच्या सोंगांचें वजन कसें पडेल? किंवा त्यांच्या तोंडून निघणाऱ्या उपदेशांचा सुपरिणाम तरी कसा होईल? दुष्ट मनुष्याच्या सोंगाची बतावणी करणाऱ्या इसमास त्याचें खासगी वर्तन फारसें आड येणार नाहीं; पण वर सांगितल्या प्रकारच्या व्यक्तींची भूमिका बजावीत असतां तें वर्तन आड आल्याशिवाय कधीही राहणार नाहीं हें नाटकवाल्यांनीं नेहमीं लक्षांत ठेवावें. त्यांतून शुद्धाचरणाच्या पौराणिक, धार्मिक किंवा ऐतिहासिक थोर पुरुषांच्या भूमिका घेणाऱ्या इसमांनीं तर ही गोष्ट विशेष लक्षांत ठेवावी. एवढ्यावरून दुष्ट मनुष्याची भूमिका घेणाऱ्या इसमानें सदाचरणानें वागुं नये असा आमचे ह्मणण्याचा अर्थ नाहीं. त्यानें सुद्धां तसेंच वागलें पाहिजे; पण चांगल्या मनुष्याची भूमिका घेणारानें तर त्याहूनही चांगलें वागलें पाहिजे. कारण वर सांगितल्याप्रमाणें तामसवृत्ती ही जात्याच मनुष्यांत प्रबल असल्यामुळे तिचा अभिनय करून दाखविण्यास किंवा तिच्याशीं तादात्म्यवृत्ती होण्यास फारसा वेळ लागत नाहीं; पण सत्ववृतीचा अभिनय करणें कठिण असून तिच्याशीं आपलें व प्रेक्षकांचें तादात्म्य करणें कठिण असल्यामुळे त्याबद्दल नाटकवाल्यांनीं अधिक खबरदारी घेतली पाहिजे. आतां 'नाटक