Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/201

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८३
भाग ३ रा.
बुकिश व संगीत नाटकें परिणामकारक
होण्याचे सामान्य नियम.

 बुकिश व संगीत नाटकें परिणामकारक होण्यास मुख्य कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याचें येथें किंचित् दिग्दर्शन करतों. नाटकांतील संविधानक प्रौढ़ असून त्यांत एखादाच रस कां असेना त्याचाच ठसा उमटविण्याचा प्रयत्न ग्रंथकर्त्यांनें केला पाहिजे व त्यास अनुकूल अशीच सामुग्री व पात्रें घालून नाटक तयार केलें पाहिजे. उगीच लोकांस शृंगार आवडतो ह्मणून किंवा लोक हांसतात ह्मणून वेळीं अवेळीं शृंगारहास्यादि रस घालण्यांत कांहीं अर्थ नाहीं. नाटकांत नूतनत्व आणवेल तितकें ग्रंथकर्त्यांनें आणलें पाहिजे; व त्यांतील कल्पना, विचार आणि हेतु हेही उदात्त असले पाहिजेत. नाहीतर परभाषेतील ग्रंथांचें केवळ भाषांतर करून अथवा इकडील पांच दहा इतर नाटकांतील कथानकें किंवा विचार उसने घेऊन नाटक बनविण्यांत तात्पर्य नाहीं. अशा नाटकांपासून मराठी वाङ्मयांत भर पडणार नाहीं, किंवा मराठी रंगभूमीची सुधारणाही होणार नाहीं. तसेंच नाटक कृत्रिम व अवघड न करितां लोकांना सहज समजेल असें केलें पाहिजे, व त्यांतील प्रवेशादिकांची रचनाही कंटाळवाणी न होईल अशी केली पाहिजे. याखेरीज पात्रांचे स्वभाव बनविण्याविषयीं, कालाची विसंगतता उत्पन्न न होऊं देण्याविषयीं, त्या त्या स्थितीचें