पान:मराठी रंगभुमी.djvu/200

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८२
मराठी रंगभूमि.


प्रत्येक प्रकारांत सुधारणा होण्यास योग्य अवसरच मिळाला नाहीं; व त्यामुळे या कलेंत जी सुधारणा झाली ती अपक्क होऊन अखेरीस ती हानिकारकच होते कीं काय अशी भीति वाटू लागली आहे. या गोष्टीचें विवेचन करीत असतां ‘ विविधज्ञानविस्तारां ' तील एका टीकाकारानें १८९८ च्या एप्रिलच्या अंकांत पुढील मार्मिक विचार प्रगट केले आहेतः- " इंग्लंडमध्यें नाटकाच्या प्रत्येक अवस्थेस परिणतावस्थेप्रत पोंहचण्यास योग्य अवसर सांपडल्यामुळे नाटकाची उत्क्रांति साहजिक त-हेनें घडून आली. आमच्या इकडे आमच्या बालकाप्रमाणेंच आमच्या नाटकाची स्थिति झाल्यामुळे प्रत्येक स्थित्यंतराचें बालपण, तारुण्य, आणि वार्धक्य, चट सारीं तीस वर्षांत आटपली. इतक्या झपाट्यानें आणि ह्यणून अपूर्ण अशी वाढ होणें हें कांहींसे अपरिहार्यच होतें. ज्याप्रमाणें कमीजास्त उष्णतेचीं दोन पात्रें जवळ जवळ ठेविलीं असतां कमी उष्णतेचें पात्र दुस-या पात्रांतील उष्णता आतुरतेनें शोषून घेण्याचा प्रयत्न करितें त्याचप्रमाणे इंग्लंडची सुधारणा पाहून हिंदुस्थानही झपाझप तो कित्ता गिरविण्याच्या नादाला लागलें व शेवटीं परिणाम ' एक धड ना भाराभर चिंध्या ! ' तात्पर्य, आमच्या नाटकांत अशा प्रकारची सुधारणा व ती इतक्या बेतानें झाली पाहिजे की, नाट्यकलेस अपाय न होतां दिवसेंदिवस ती वृद्धिंगत होत गेली पाहिजे.