Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मराठी रंगभूमि.

 "रावबाजीच्या उत्तेजनानें पुणें शहरांत व त्या शहरचा वारा लागून जेथें तेथें शिमग्याचें चांदणें वाढत चाललें होतें. दिवसास ब्रम्हभोजनाचा थाट आणि दिव्यांत वात पडली नाहीं तों मंदिरांत चवघडे, सनया यांचा मंजूळ घोष, श्रीमंतांच्या व सरदार लोकांच्या वाडयांत सरकारी ताफ्यांचे मुजरे, रात्रीस रस्त्यांत आणि बोळांत फिरणा-या विलासी लोकांचीं मनें ओढून घेणारे नुकतेच चिमणी, साळू, मैना यांच्या मंजुळ कंठांत होणाजी बाळानें घातलेले खडे सूर, आणि फौजेकडील शिलेदार, बारगीर, शिपाई आणेि शहरांतील सुखवस्तु शिंपी, माळी, सराफ, दुकानदार यांस रिझविण्याकरितां बहिरू, मल्हारी, धोंडी बापू, सगनभाऊ आणि रामा गोंधळी यांनीं सजविलेले डफतुणतुण्याचे तमाशे आणि कलगीतुऱ्याचीं भांडणें,हे सर्व थाट रावबाजीच्या उल्हसित मनोवृत्तींच्या प्रेरणेनें पुणें शहरांत जेथें तेथें गाजून रााहले होते. मग ' यथा राजा तथा प्रजा' या न्यायानें त्या प्रेरणेचा अंमल सर्व पेशवाईत पसरला नसेल असें संभवत नाहीं. त्या काळीं सर्व गुणिजनाचे आशेनें भरलेले डोळे पुणें शहराकडे लागले असून त्या शहरानें जो कित्ता घातला होता त्याची नक्कल जेथें तेथें होऊन कित्येक ठिकाणीं त्या नकलेवर ताण करणारे उमेदवारही निपजूं लागले."*


* केकावलि-प्रस्तावना.