पान:मराठी रंगभुमी.djvu/165

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४७
भाग २ रा.


स्वारी केली. शालिनी पुरुषवेषानें अरण्यांत शिकार करीत असतां शूरसेनाची व तिची गांठ पडून त्यानें तिला वाघाच्या तावडींतून सोडविलें. शालिनीनें आपणास शालीन असेंच नांव धारण करून या वेळीं आपली खरी ओळख दिली नाहीं. पण शूरसेनावर प्रीति जडून त्यानें आपणास वरावें, अशी इच्छा तिच्या मनांत उद्भवली. शुंभसेनास शालिनी आपणास वरीत नाहीं ह्मणून वाईट वाटून त्यानें फत्तेसिंगाच्या मदतीनें शूरसेनाचा सूड घेण्याचा निश्चय केला, व प्रकोपाकडून त्यास तुरूंगांतही टाकविलें. पुढें वीरसेनानें शूरसेनाचा मुलगा बकुल यासह प्रकोपाच्या राज्यावर स्वारी करून शूरसेनास सोडविलें. पुढें शूरसेनानें शालिनीस व वीरसेनानें शालिनीची धाकटी बहीण मालिनी ईस वारिलें.
 यांतील शुंभसेन हा कावेबाज पण भितरा, हुषार पण दगलबाज, असा दाखविला आहे. फत्तेसिंग हा द्रव्यलोभी आहे, व पैसा हटला कीं त्याकरितां हवें तें करणारा आहे. शूरसेन हा मुख्य नायक असून तो शूर, विनयी, ममताळू असा दाखविला आहे; व शूरसेनावर लुब्ध झालेली नायिका शालिनी ही गुणग्राही व निश्चयी अशी दाखविली आहे. असो; या नाटकांतील संविधानक विशेष बहारीचें नसून शालिनीखेरीज इतर पात्रांचे स्वभावही साधारणच रेखले आहेत. त्यामुळे नाटकाचा ठसा लोकांच्या मनावर उमटावा तसा उमटत नाहीं.