Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४६
मराठी रंगभूमि.

गायनाचे प्रकार करवितात, तसा हळदीकुंकवाचा व शिवालयाचा देखावा दाखवून मुलींकडून नृत्यगायन या नाटकांत करविलें आहे. शिवालयांत मुलींकडून ईशस्तवनपर जीं दोन पद्ये ह्मणविलीं आहेत त्यांपैकीं ' शंभो शिवहर, करुणाकर ' हें पद्य ह्मणतांना जुन्या पद्धतीनें रागदारींतील सुरांचे जे आरोहावरोह शिकविले आहेत त्यानें एक प्रकारचा भव्यपणा येऊन प्रेक्षकांचें मनोरंजनही चांगलें होतें. या नाटकांत शारदेचें काम करणारा इसम जातीनें मराठा असून तें सार्धेच पण भारदस्त होतें, व शारदेच्या आईचें काम रा० गोरे हे करीत असून त्यांचा अभिनय व गाण्याची मुरकी हीं लोकांस बरींच आल्हादकारक होतात.
 किर्लोस्कर मंडळीनें या वेळीं हातीं घेतलेलें दुसरें नाटक ह्मटलें ह्मणजे ' वीरतनय ' हें होय. हें नाटक रा. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर बी.ए.एल एल.बी.यांनीं रचलें आहे. हें कशाचें भाषांतर नसून स्वतंत्र आहे. यांतील संविधानकाचें तात्पर्य असें आहे:-वीरसेन नांवाच्या राजानें प्रकोप नांवाच्या दुस-या एका राजाची थाेरली मुलगी शालिनी इजबद्दल मागणी घातली असतां ती नाकारून प्रकोपानें शालिनीस आपला प्रधान जो शुंभसेन यास द्यावयाचें ठरविले.आपली मागणी नाकारल्याबद्दल वीरसेनास राग येऊन त्यानें आपला सेनापती शुरसेन यासह प्रकोपाच्या राज्यावर