मराठी रंगभूमीची आजमितीला जी स्थिति आहे तिची सुमारें साठ वर्षांपूर्वी महाराष्ट्रांतील लोकांना कल्पनाही नव्हती. त्यावेळीं व तत्पूर्वी नाटकाचे प्रकार कायते दोन माहीत होते. एक तमाशा व दुसरें लळीत. पैकीं लळिताचा प्रकार फार दिवसांचा असून देवादिकांच्या उत्सवप्रसंगीं अथवा नवरात्राच्या अखेरच्या दिवशीं बहुधा तीं पुष्कळ ठिकाणीं होत असत. ललितामध्यें आरंभीं देवादिकांचीं सोंगें आणून दशावतारांतील थोडथोडी ईश्वरलीला करून दाखवीत असत, व शेवटीं रामाकडून रावणाचा वध करवून लळीत संपवीत असत. यांत जीं सोंगें आणीत तीं ओबडधोबड अशींच आणीत व रात्रीं हिलालांत सरक्या घालून किंवा तेलाचे कांकडे पेटवून त्याच्या उजेडांत खेळ करीत. खेळाला सामानसुमानही फार लागत नसे. पुढें एक अलवानीचा पडदा, पांच चार धोत्रें व लुगडीं, एक दोन किरीट, थोडा पालापाचोळा आणि राळ, एवढें झालें म्हणजे झालें. अशा रीतीचीं लळितें पूर्वी कोंकणांत पुष्कळ होत असत व हल्लींंही कोठें कोठे होतात.वृद्ध लोकांच्या तोंडून जी माहिती मिळते त्यावरून भानुदाससंप्रदायी मंडळी केव्हां केव्हां अशीं लळितें करीत असत असें समजतें. लळितांत अभिनय,सगतवार भाषण, वैगैरेंचा अभाव असून सरासरी धागडधिंग्यांतलाच प्रकार