पान:मराठी रंगभुमी.djvu/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना.

रंगभूमीची मूळ पीठिका दिली असून पौराणिक, बुकिश, ऐतिहासिक व सामाजिक विषयांवरील नाटकें करणाऱ्या निरनिराळ्या कंपन्यांची हकीकत दिली आहे; दुसऱ्या भागांत संगीत नाटकांची सुरवात कशी झाली हे सांगून निरनिराळ्या संगीत कंपन्यांची माहिती दिली आहे; व तिस-या भागांत ग्रंथकार, नट, नाटकमंडळ्या वगैरेंस उपयोगी पडतील असे स्वतःचे सामान्य विचार दिले असून नाट्यकलेसंबंधाने आजपर्यंत विद्वानांनी प्रगट केलेले बरेच विचार दिले आहेत. हे विद्वानांचे विचार माझ्या मते अत्यंत महत्वाचे असून त्यांचे महत्व कमी होऊ नये ह्मणून त्यांचा माझ्या सूचनांत सहसाउपयोग केला नाही.

 या पुस्तकाचा समाजावर इष्ट परिणाम झाल्यास माझ्या श्रमाचे सार्थक झाले असें मी समजेन.

 पुस्तक लिहितांना माझे मित्र रा. रा. बा. वेलणकर यांनी मला काही उपयुक्त सूचना केल्याबद्दल त्यांचे व ज्यांनी ज्यांनी या विषयासंबंधाने माहिती दिली त्यांचे मी मनापासून आभार मानितो. तसेच पुस्तक लवकर छापून देण्याचे कामी 'आर्यभूषण ' छापखान्याचे म्यानेजर यांनी मेहनत घेतली याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे.

 पुणें,

ता १।११।०३.
आप्पाजी विष्णु कुलकर्णी