पान:मराठी रंगभुमी.djvu/117

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९९
भाग २ रा.


प्रभूति मंडळींच्या सहवासानें ते नाटकांत असें कांहीं मजेदार काम करूं लागले कीं, थोडक्याच दिवसांत लोकांच्या तोंडीं ‘ भावडया' हाच विषय कांहीं दिवस होऊन बसला. भाऊरावांचा आवाज पाहाडी असून गोड होता. शिवाय नखरेबाज गाण्याचे ढंग त्यांच्या आंगीं पूर्णपणें असल्यामुळे रंगभूमीवर येऊन आपल्या पद्यांस सुरवात केली कीं, उत्तम नागसराच्या आवाजानें नाग जसा डोलू लागतो तद्वत् भाऊरावांच्या गाण्यानें प्रेक्षकसमूह भारून जाऊन तोही आनंदानें डोलू लागे. नाटकगृहांत कितीही दंगा व कलकलाट असो, भाऊराव रंगभूमीवर


 नाटकांतील लोकांस ' गण्या ' , ' बाळ्या ' अशा नांवानें उद्देशून बोलण्याची चाल आमच्या समाजांतील लोकांत पडली आहे. त्याप्रमाणेंच भाऊरावांसही ' भावड्या ' नांवानें लोक उद्देशून बोलत असत. एकदां अशी गम्मत झालेली आह्मी पाहिली आहे कीं, एका टुकानांत कांहीं मंडळी चकाट्या पिटीत बसली असतां तेथें दुस-या नाटकांतील एक गृहस्थ आले होते. त्यांनीं 'काल भाऊरावांनीं फारच बहार केली; त्यांचा आवाज काय,गाणें काय, छे छे ! असे गृहस्थ अगर्दी टुर्मिळ ! ' अशी त्यांची स्तुति केली, ही स्तुति ऐकून तेथे जमलेल्या गृहस्थांपेकीं नाटक न पाहिलेल्या एका गृढ्स्थानें आपल्या जवळच्या एका गृहस्थास विचारलें कीं, ' अहो, भाऊराव, भाऊराव ह्मणून ह्मणतात तो इसम कोण ? त्या गृहस्थानें उत्तर केलें 'अहो, तो भावडया हो. ' हे शब्द कानीं पडतांच त्या नाटक न पाहिलेल्या गृहस्थानें ' हं हं तो भावड्या होय ?' असें ह्यणून जणूं, काय भाऊरावांची एकदम ओळख पटली असें दाखविलें. तात्पर्य, ‘ भावड्या ' हेंच नांव त्या वेळी लोकांच्या तोंडीं बसलें होतें.