Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/२७४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२४०
मराठी रंगभूमि.
नाटकांत मुख्य कोणत्या गोष्टी साधल्या
पाहिजेत?

 नाटकाचा प्रधान हेतु लोकांच्या चित्ताचें रंजन हा असल्यामुळें त्याच्या सिद्धयर्थ यत्न करणें हें नाटककर्याचें पहिलें कर्तव्य आहे. चित्ताचें रंजन करण्यासाठीं सभ्यता,शिष्टाचार किंवा नैतिक बंधनें यांचा अतिक्रम केला पाहिजे असें नाहीं.तसे करण्यापासून हलकट लोकांच्या चित्ताचें रंजन होऊन नाटककर्त्याची अशा लोकांत चहा होईल ही गोष्ट खरी आहे. पण ही चहा अशिक्षित किंबहुना हलकट बाजारबुणग्यांतच होईल;शिष्टसमाजांत त्याचा धिःकारच केला जाईल, हे त्यानें पक्के लक्षांत ठेवावें.फडाच्या तमाशाला एखाद्या पौराणिक कथेचें स्वरूप देऊन रंगभूमीवर आणून ‘हे मदंगा' सुरू केला, म्हणून त्याला भुलून खरोखरच 'नाटकां'त त्याची गणना करण्याइतके शिष्ट लोक खुळे थोडेच झाले आहेत ! नाटक तें नाटक आणि तमाशा तो तमाशा. नुसत्या नांवांत काय आहे ? असो; नाटकाला मनोरंजकत्व येतें तें पुष्कळ वेळां संविधानकरचनाचातुर्य आणि पात्रांच्या भाषणांतील विनोद यामुळें येतें.पण तो विनोद सभ्यतेस धरून असला पाहिजे. सारांश,नाटकास मनोरंजकत्व आणणें हा नाटककर्त्याचा पहिला कर्तव्यभाग झाला.
 याच्या पुढची पायरी म्हणजे नाटकांतल रसाविर्भाव.नायक व नायिका यांच्या मनांतल्या भावाशीं वाचकांच्या मनांतल्या भावांची तादाम्यता झाली पाहिजे.याकरितां नायक व नायिका धीरोदात्त, गंभीरवृत्ति,सद्गुणी आणि निष्कलंक असावीं असे नियम संस्कृत नाट्याचार्यांनी घालून ठेविले आहेत.नाटकांत रसाविर्भाव अनेक उपायांनी करतां येतो,त्यापैकीं व्यतिरेक हा एक उपाय आहे. दोन परस्परविरोधी गोष्टींच्या सानिध्यानें त्या दोहींतलेही गुण विशेष खुलून दृष्टोत्पत्तीस येतात,म्हणून नाटकांत सद्गुणी माणसांचा छळ आणि दुर्जनांची चैन, शूर पुरुषांवर संकटे आणि भित्र्यांच्या वल्गना,पतिव्रतेवर सतीत्वभंग