पान:मयाची माया.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग २ रा. राग आला ! बोल, बोल प्यारा फिरोज प्रेमानें अंध होऊन मी आपले सर्वस्व तुझ्या स्वाधीन केलें ! आईचापांची मजवर खप्पा मर्जी. झाली. हे सर्व तुला माहीत असतां तूंही जर मजवर रागावलास तर मी कोणासाठीं या जगांत जगावें ! माझे जिवाचे कलीजा, ज्यावेळेस तूं मजपाशीं उभा होतास त्यावेळीं मी तुजजवळ बोललें नाहीं ह्मणून तुला राग यावा है अगदीं स्वाभाविक आहे. परंतु, माझा भाऊ व माझ्या आईबापांच्या मनांतून मीं ज्याच्याशी लग्न लावावें, तो हे दोघेहीजण पलीकडल्या बाजूस उभे राहून तुजकडे त्वेषाने पहात होते ही गोष्ट तुझ्या ध्यानांत आली नसावी असे दिसतें. तुला एकीकडे गाठून दोन शब्द तरी बोलावेत ह्मणून मीं दोनचारदां प्रयत्न केला परंतु, ते जवळ असल्यामुळे तो सिद्धीस गेला नाहीं. शेवटी त्यांची नजर चुकवून मी कारंज्यापाशी आले परंतु तेथेही मला न कळत त्यांनी माझा पाठलाग केला. माझे सर्व उपाय हरले. ह्मणून निराश होऊन त्यांच्याबरोबर मी परत जाणार; इतक्यांत माझी एक मैत्रीण सुदैवानें मला बाहेर भेटली व तुला आपोलोबंदराकडे वळतांना पाहून तुझी भेट घ्यावी या इराद्यानें मैत्रिणीच्याबरोबर तिच्या घरीं जाण्याचा बहाणा करून मीं येथें तुला गाठलें. तरीदेखील तुझा राग मजवर असावाना ! अथवा तुला तरी दोष देऊन काय उपयोग. मीच दुर्दैवी ह्मणून तुला मजवर विनाकारण रागवावें असें वाटलें ! त्याला तुझा इलाज काय ? " असे ह्मणून माझ्या खांद्यावर डोके ठेवून ती ओकसाबोकशीं रडूं लागली. हे गौडबंगाल काय आहे याचा मला कांहींच उलगडा होईना. अजूनही मी स्वप्नांत तर नाहींना- छे पण स्वप्न कसलें ! तिचा कोमल बाहुपाश माझ्या गळ्याभोवती असतां, माझ्या खांद्यावर डोके ठेवून ती ओकसाबोकशी रडत असतां स्वप्न म्हणून तरी कसे समजावें ! तिनें आपलें मुख माझ्या मुखाजवळ आणिलें तेव्हां तिच्या तोंडाला मदिरेची घाण येत होती. तेव्हां त्याचे धुंदीत मला आपला प्रियकर समजून तिच्या हातून हा प्रमाद घडला असेल असे मला वाटले. परंतु विचार करण्याचा तो काळच नव्हता. एकंदर गोष्टीं इतक्या विलक्षण तऱ्हेच्या घडत होत्या कीं अचंब्यामुळे, मनाच्या