पान:मयाची माया.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. उछृंखलपणामुळें, सर्वथैव वासनाधीन झाल्यामुळे काय करावें व काय चाललें आहे याची मला शुद्धिच नव्हती. एकवार आपण कोण आहोत हें हिला सांगून हिच्या मोहपाशांतून आपण मुक्त व्हावें अशी विवेकबुद्धि जागृत होई तोंच असलें स्त्रीरत्न अयाचित् व अकल्पित् गळां पडत असतां त्याचा आव्हेरे करणे हा केवळ नामर्दपणा आहे असा दुसरा विचार मनांत येई. या परस्पर विरोधी विचारांच्या कात्रीत माझें धैर्य, माझी विवेकबुद्धि पुरी कातरली जाऊन मी शुद्ध बावरून गेलो होतो. हे सर्व विचार डोक्यांत येऊन माझी ही स्थिती व्हावयाला दहा पांच सेकंदही लागले नसतील. परंतु तितकावेळही मी स्वस्थ बसलेला तिला खपलें नाहीं. अरे निर्दया, मी तुझी इतकी विनवणी करीत असतां - मी किती परवश आहे हे तुला सांगत असतां व तुलातें माहित असतां-तूं अया- पही आपला राग सोडीत नाहींस ना ! मजसंबंधीं तुझ्या मनांत कांहीं बिकल्प तर आला नाहींना ! तुझ्या शिरीन्वरचें तुझें प्रेम कमी तर झाले नाहींना ! किंवा आपल्या उभयतांच्या प्रणयामध्ये हजार विघ्नें पाहून तुझें मन उद्विग्न झाले नाहींना ! "

तिच्या इतक्या विनवण्या ऐकून माझी सदसद्विवेकबुद्धि केव्हांच पळून गेली होती. व तिच्या मनोदयाप्रमाणे मी वाटेल तसा वागावयाला व वाटेल ती बतावणी करावयाला तयार झालो होतो. परंतु आपण जर बोलूं लागलों तर तिच्या प्रियकराच्या व माझ्या आवाजांतील भिन्नत्व कळून आपल्या सर्व मनोरथावर विरजण पडेल अशी मला नवीनच भीति उत्पन्न झाली. तथापि काय होईल तें होवो, असा विचार करून अगदीं पार्शी तहेवर बोलण्याचा मीं उपक्रम केला. मी गुजराथी असल्यामुळे त्यांची भाषा मला पूर्ण अवगत होतीच. मी तिच्या गालाला हात लावून ह्मणालों, "प्यारी शिरीन्, तुझ्यासारख्या परीसाठीं एखादा राजा असला तर तो आपलें राज्यही सोडण्यास तयार होईल. असे असतां मी तुझा आव्हेर करीन है घडेल तरी कसें ! परंतु आज माझें मन अगदी उदास झाले आहे. तेव्हां माझ्यानें कांहीं बोलवत नाहीं. " इतकेंच मोघम बोलून आपला आवाज ही ओळखते की काय, अशा भीतीनें ती पुढे काय बोलते तें ऐकण्याकरितां साशंक मुद्रेनें मी तिजकडे पहात राहिलों. त्यावर ती तरुणी एकवार माझ्या