पान:मयाची माया.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८

प्रसंग ३ रा.

सारखे नव्हतें. तरी भीतीनें मी गांगरून गेला आहे असे पाहूनच त्यांना हंसूं आलें असावें अशी मला लागलीच शंका आली. पण बराच वेळ - पर्यंत त्यांच्याशीं मी एक अक्षरही बोललों नाहीं. कारण त्यांच्याशीं निर्धास्तपणाने बोलण्याचें धैर्य माझ्यामध्ये राहिले नव्हतें ! भयानें माझी वाचा बसण्याचीच वेळ आली होती; व तो पारशी तरुण जर इतक्यांत तेथून निघून न जातां मी उभा होतो तेथपर्यंत आला असतां तर त्याच्याशी दोन हात करण्यापूर्वीच कदाचित् माझें सर्व धैर्य, अवसान वगैरे एकाएकी गळून मी बेशुद्धही होऊन पडलों असतों; पण आपल्यावर आलेले संकट तेवढ्या वेळा पुरतें तरी टळले असे पाहून मला किंचित् बरे वाटले. तरी पण त्या परक्या स्त्रियांच्या-- शिरीनच्या मैत्रिणींच्या-- देखत तिच्याशी बोलण्याची मला लाज वाटत होती.

आपण विचारलेल्या प्रश्नाला मी कांहींच उत्तर देत नाहीं असें पाहून

शिरीन किंचित् लडिवाळपणानें मला ह्मणाली " पिरोज, या परक्या स्त्रियांच्या देखत माझ्याशी बोलण्याचा तुला कदाचित् संकोच वाटत असेल; पण तसें तूं मुळींच समजूं नको. या माझ्या अगदी जिवाच्या मैत्रिणी आहेत. तुझ्याशीं घडून येणाऱ्या माझ्या संबंधानें या दोघींनाही मोठा आनंद होत आहे. आतां आपण सर्वजण थोडीशी शराब घेऊं व लागलीच येथून निघून जाऊं. " असे सांगून तिने बॅगमधील एक सोडावॉटरची बाटली उघडून ती दोन्ही ग्लासांत ओतली व एक ग्लास माझ्यापुढे केला. तो कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेतां मीं लागलीच पिऊन टाकला. आपलें प्रेम माझ्यावर जडले आहे ही गोष्ट शिरीननें इतक्यांतच आपल्या मैत्रिणींना कळूं यायची नव्हती असे मला वाटलें; व तिच्या त्या अमर्यादिपणाबद्दल मीं मनांत तिला थोडासा दोषही दिला. तिच्या त्या मैत्रिणी माझ्याकडे एकसारख्या टक लावन पहात होत्या; व तिची ती गुजराथी सखी तिला ह्मणाली " गडे शिरीन् आतां येथून तूं आपल्या घरीं जातां जातां मला माझ्या घरी पोंचविशील तर बरं होईल. मी आतां इतक्या रात्री एकटी कशी जाऊं ? "

मंदिरेनें भरलेला पेला तोंडाला लावीत असतांना शिरीनने उत्तर केलें,