पान:मनू बाबा.djvu/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "स्त्रियांच्या हातांत जादू आहे. स्त्रियांच्या हातांचा स्पर्श होताच अमंगलाचं मंगल होतं. मरणाचं जीवन होतं. खरं ना?" इंदुमतीने हसून विचारले.

 "होय. स्त्री म्हणजे सौंदर्यदेवता. स्त्री म्हणजे व्यवस्था. स्त्री म्हणजे नीटनेटकेपणा. स्त्रियांना घाणेरडं आवडत नाही. भांडी स्वच्छ ठेवतील. घर स्वच्छ ठेवतील. कपडे स्वच्छ ठेवतील. स्त्रियांशिवाय स्वछता कोण ठेवणार? प्रसन्नता कोण निर्मिणार? स्त्रियांशिवाय संसार नीरस आहे. तुम्ही संसारातील संगीत, संसारातील माधुर्य. पुरूष अव्यवस्थित असतो. तुम्ही त्याच्या जीवनात व्यवस्था आणता. त्याला वारेमाप जाऊ देत नाही. आदळ-आपट करू देत नाही. इंदू, खरोखरच तुझ्या हातांत जादू आहे. तुझा स्पर्श अमृताचा आहे." संपतराय प्रेमाने म्हणाला.

 गडीमाणसे आता वेळच्या वेळी कामे करीत. पूर्वी त्यांना वाटेल तसे वागण्याचा ताम्रपट असे. आता गड्यांना उजाडले नाही तो अंगण झाडावे लागे. कारण इंदुमती स्वतः सडा घाले. सुंदर रांगोळी काढीत असे. "सूर्यनारायण दारात उभे राहाणार. त्यांचं स्वागत नको का करायला? सारं स्वच्छ व पवित्र नको का?" असे ती म्हणे.

 दिगंबररायांना सुनेचा आटोप पाहून समाधान वाटले. ते आता अशक्त झाले होते. आपण फार दिवस जगू असे त्यांना वाटत नव्हते. एके दिवशी संपत त्यांच्याजवळ बसला होता. त्याला ते म्हणाले, "संपत, मी आता दोन दिवसांचा सोबती. या जगाचा आता विसर पडू दे. देवाकडे माझं चित्त लागू दे. तुला शेवटचे दोन शब्द सांगतो; ध्यानात धर. तुला शीलवती, गुणवती, रूपवती अशी पत्नी मिळाली आहे. रत्न मिळलं आहे. ते नीट सांभाळ. तिला अनुरूप वाग. दोघांनी सुखानं संसार करा. कोणाला दुखवू नकोस. श्रींमंतीचा तोरा मिरवू नकोस. होईल ती मदत करीत जा. सत्यानं राहा. न्यायानं राहा. आपणाला श्रीमंती आहे ती गर्व करण्यासाठी नाही. दुसऱ्याच्या उपयोगी पडावं म्हणून आहे. आपली संपत्ती म्हणजे गरिबांची ठेव. ती त्यांना वेळोवेळी देत जा. व्यसनात पडू नको. आळशी राहू नको. उद्योगात राहावं, म्हणजे शरीर व मन निरोगी राहातं.

३४ * मनूबाबा