आले. ते मंडप कापडण्यात आले. हंड्या, झुंबरे वगैरे थाट होता. आणि आमचा मनूबाबा! त्याने नवरदेवासाठी हळुवार हाताने नाजूक तलम वस्त्रे विणली. नववधूसाठी वस्त्रे विणली. त्याला भरपूर मजुरी मिळाली. लहानग्या मुलीसाठी ती झाली.
लग्नाचा दिवस आला. मोठा सोहळा झाला. लग्न लागले. वधूवरांनी परस्परांस माळा घातल्या. बार वाजले, वाजंत्री वाजली, चौघडे वाजले. रात्री मोठी वरात निघाली. घोड्यावर बसून वधूवरे जात होती. चंद्रज्योती लावल्या जात होत्या. मनूबाबा त्या लहान मुलीला वरात दाखवण्यासाठी उभा होता. ती लहान मुलगी वरात बघत होती. घोड्याकडे बोट दाखवीत होती. संपतरायाचे लक्ष त्या मुलीकडे गेले. त्याच्या डोळ्यांत पाणी आले. आईवेगळी मुलगी. अरेरे!
गावात मोठी मेजवानी झाली. झाडून साऱ्या गावाला लाडू मिळाले. परंतु मनूबाबा जेवायला गेला नाही. त्याच्या घरी लाडू पाठविण्यात आले. त्या लहान मुलीला सुंदर कपडे पाठविण्यात आले. बाळलेणे पाठविण्यात आले. परंतु मनूबाबाने ते बाळलेणे मुलीच्या अंगावर घातले नाही. त्याने ते कपडे तिला चढविले नाहीत. तो म्हणाला, "मी माझ्या श्रमानं पैसे मिळवीन व बाळलेणे करीन. मी स्वतः सुंदर वस्त्र विणीन व त्याची आंगडी या मुलीला करीन, लोकांची कशाला?"
वधूवरांस सर्व गावाने दुवा दिली. वधूवरांचा नवीन संसार सुरू झाला. इंदुमती आता आपल्या सासरी रहायला आली. सासू नव्हतीच. तीच आता घरधनीण होती. घरात येताच तिने घराला कळा आणली. सारा वाडा तिने स्वच्छ झाडायला लावला. कोळिष्टके उडून गेली. वाडा आरशासारखा झाला. वरती दिवाणखाना होता. त्यात मोठमोठ्या तसबिरी होत्या. त्यांच्यावर खंडीभर धूळ बसली होती. इंदुमतीने स्वतः ती धूळ पुसून काढली. तसबिरी प्रसन्न दिसू लागल्या. दिवाणखान्यात स्वच्छ बैठक घालण्यात आली. शुभ्र असे लोड तेथे ठेवण्यात आले. फुलदाणीत फुलांचा गुच्छ ठेवण्यात आला. दिवाणखान्याला तेज चढले.
"किती आता प्रसन्न वाटतं! पूर्वी या दिवाणखान्यात येऊ नये असं वाटे." संपतराय म्हणाला.
संपतरायाचे लग्न * ३३