समजलं ना? मला आता कसलीही इच्छा नाही. तुमचा दोघांचा जोडा पाहून डोळे कृतार्थ झाले. तो ठकसेन कुठं असेल देवाला माहीत. परंतु नको त्याची आठवण. जर कधी काळी आला, आधारासाठी आला तर त्याला जवळ घे. कसाही झाला तरी तो तुझा भाऊ. परंतु जपून वाग."
पित्याचे शब्द ऐकता ऐकता संपतचे डोळे भरून आले. इतक्यात इंदुमती तिकडून आली. ती सासऱ्याचे पाय चेपीत बसली. सासऱ्याने तिच्याकडे पाहिले. तो म्हणाला, "इंदु, तुझ्या हातांत सारं आहे. हा संपत तुझ्या हाती दिला आहे. त्याला सांभाळ. त्याच्या जीवनाला घाण लागू देऊ नकोस. त्याचा दिवाणखाना स्वच्छ केलास. तिथं फुलांचे गुच्छ ठेवलेस. तेथील तसबिरी झाडल्यास. संपतच्या हृदयाचा दिवाणखानाही निर्मल ठेव. तिथं भक्ती, प्रेम, दया, पवित्रता यांचा सुगंध पसर. समजलीस ना? तू थोर मनाची आहेस. आता मला काळजी नाही. संपतची जीवननौका तू नीट वल्हवून नेशील. सुखी राहा. एकमेकांची इच्छा सांभाळा. ओढून धरू नका. संशय मनात वाढू देऊ नये. संशय मनात येताच तो निस्तरून घ्यावा. मोकळेपणा असावा. प्रेम हे मोकळं असत. प्रेम भीत नाही. शंका आली, विचारावी. कधी भांडण झालंच तर पुन्हा विसरा. पुन्हा हसा. जो आधी भांडण विसरून हसेल तो खरा. हसतेस काय इंदु? तुला समजतं सारं. पण मला राहावत नाही म्हणून सांगतो."
दिगंबररायांनी पुत्राचे व सुनेचे हात आपल्या हातांत एकत्र घेतले. नंतर त्यांनी त्यांच्या डोक्यांवर आपला मंगल हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. संपत व इंदु दोघांचे डोळे भरून आले होते. दोघांचे का - तिघांचे डोळे भरून आले. तिघांची हृदये भरून आली, आणि दिगंबररायांची घटकाही भरत आली.
एके दिवशी दिगंबरराय देवाकडे गेले! साऱ्या गावाला वाईट वाटले. अनेक स्नेही-सखे, आप्त-ईष्ट समाचारासाठी आले. हळूहळू दुःख कमी झाले. संपतराय आता धनी झाला. इंदुमती व तो दोघे सुखाने राहू लागली. वडिलांप्रमाणे नीट कारभार चालवू लागली.
संपतरायाचे लग्न * ३५