त्या लहान मुलाची वाणी निर्मळ होती. ती वाणी गोड वाटत होती. अभंग म्हणून झाल्यावर रामूने आईच्या गळ्याला एकदम मिठी मारली. तिने त्याचा प्रेमाने मुका घेतला.
"मीही माझ्या सोन्याच्या त्या मोहरांचे असेच मुके घेत असे. त्या मोहरा म्हणजे जणू माझी मुलं, त्यांचे मी मुके घेत असे. त्यांना मी पोटाशी धरीत असे. आता कोणाला धरू पोटाशी, कोणाचे घेऊ मुके?" मनूबाबा म्हणाला.
"या माझ्या रामूचे घ्या." साळूबाई म्हणाली.
"रामूचे?" मनूबाबा आश्च्रर्याने विचारले.
"हो. रामू म्हणजे आमचं सोनं. आम्ही मोलमजुरी करतो, परंतु कोणासाठी? या रामूसाठी. आमचे पैसे या रामूसाठी. रामू आमची धनदौलत. चालती बोलती धनदौलत. हसणारी, खेळणारी धनदौलत." असे म्हणून साळूबाईने पोटाशी धरले. थोडा वेळ कोणी काही बोलले नाही.
"आज मनूबाबा, तुम्ही किनई, आमच्याकडेच जेवायला या. घरी करू नका. आणि आता हे थालीपीठ आणलं आहे ते खा. आज सकाळी कामाला जाताना म्हणाले, 'थालीपीठ कर.' केलं. पुरुषांच्या पोटांना निरनिराळे पदार्थ हवे असतात. आम्हा बायांना काहीही चालतं. घ्या हे थालीपीठ. नाही म्हणू नका. तुम्ही बरेच दिवसांत खाल्लं नसेल." साळूबाई म्हणाली.
तिने म्हाताऱ्याच्या हातांत थालीपीठ दिले. पानात गुंडाळलेले होते ते. मनूबाबा त्याच्याकडे पाहात राहिला. त्याने एक तुकडा रामूला दिला.
"त्याला कशाला? तो सारं खाईल. लबाड आहे तो. तुम्हीच खा. मी आता जात्ये. आणि तुम्ही किनई, मनूबाबा, फार नका काम करीत जाऊ. जरा हसत बोलत जा. देवदर्शनाला जात जा. भजन करा. समजलं ना?" असे म्हणून साळूबाई रामूला घेऊन निघाली.
मनूबाबा खुर्चीतच होता. गावातील किती तरी मंडळी येऊन गेली. परंतु साळूबाईचे बोलणे किती साधे, किती प्रेमळ! त्याच्या मनावर
२२ * मनूबाबा