पान:मनू बाबा.djvu/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याचा परिणाम झाला. त्याच्या त्या खोल गेलेल्या डोळ्यांतून पाणी येणार होते. परंतु मोठ्या कष्टाने ते त्याने आवरले. गेल्या पंधरा वर्षात त्याच्या हृदयाला भावनाचा स्पर्श झाला नव्हता. स्वत:च्या हृदयाची जाणीवच जणू त्याला नव्हती. परंतु त्याला स्वतःला हृदय असल्याची जाणीव झाली. त्यालाही गोड गोड अभंग आठवू लागले. आपण एके काळी देवळात जात असू, देवासमोर बसत असू. ते त्याला आठवले. हृदयाचे बंद दार जरासे किलकिले झाले. ते दार गंजून गेले होते, परंतु साळूबाईच्या शब्दातील स्नेहाने गंज निघून गेला. दार जरा उघडले. थोडासा प्रकाश हृदयात शिरला.

जमीनदार व त्याचे दोन मुलगे * २३