पान:मनू बाबा.djvu/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सकाळी सर्व गावात चोरीची वार्ता पसरली. सारा गाव मनूच्या झोपडीपाशी जमा झाला. जो तो हळहळत होता. प्रत्येकाला वाईट वाटत होते. मनू खिन्न होउन बसला होता. त्याचे आधीच खोल गेलेले डोळे एका रात्रीत आणखी खोल गेले. त्याच्या तोंडावर प्रेतकळा आली होती. एक शब्दही त्याला बोलवेना.

 मनूच्या झोपडीपासून थोड्याशा अंतरावर सखाराम राहात असे. सखाराम मोलमजुरी करी. त्याच्या बायकोचे नाव साळूबाई. साळूबाई मोठी प्रेमळ होती. दुसऱ्याची मनःस्थिती तिला पटकन समजे. तिला एक मुलगा होता. असेल पाच-सहा वर्षांचा, मोठा गोड मुलगा. तो आईबापांचा फार आवडता होता. त्याचे नाव रामू.

 साळूबाई रामूला बरोबर घेऊन मनूकडे आली. गर्दी आता ओसरली होती. लोक आपापल्या उद्योगाला निघून गेले होते. मनू तेथे एका जुन्या आरामखुर्चीत विषण्णपणे पडला होता.

 "वाईट झालं हो. कसे नेववले पैसे तरी. वाईट नका वाटून घेऊ वाईट वाटून काय करायचं मनूदादा? आणि तुम्ही भारीच पैशाच्या मागं लागता. कधी देवळात जात नाही. देवदर्शन करीत नही. एकादशी नाही. सोमवार नाही. रोज उठून मेलं ते अक्षै काम! काम! मनूदादा, काम करावं परंतु रामाला विसरू नये. देवाला विसरू नये. आता देवाला विसरू नका. कधी भजनाला जात जा. तुम्हांला येतं का भजन? या आमच्या रामूला येतात अभंग. रामू, दाखव रे म्हणून अभंग. हसतोस काय लबाडा! म्हण की. मनूबाबांना म्हणून दाखव." साळूबाई बोलत होती.

 रामू लाजला. त्याने आपले डोळे दोन्ही हातांनी मिटले. पुन्हा ते हळूच उघडून त्याने बघितले. नंतर आईच्या पाठीमागे जाऊन लपला.

 "म्हण ना रे. लाजायला काय झालं?" आई म्हणाली.

 रामू अभंग म्हणू लागला.

  आता तरी पुढे हाचि उपदेश, नका करू नाश आयुष्याचा
  सकलांच्या पायां माझे दंडवत, आपुलाले चित्त शुध्द करा
  हित ते करावे देवाचे चिंतन, करूनिया मन एकविध
  तुका म्हणे हित होय, तो व्यापार करा, काय फार शिकवावे||

                          जमीनदार व त्याचे दोन मुलगे * २१