परंतु ते जवळ असणे, त्यांचा स्पर्श बोटांना होणे, त्यांचे दर्शन डोळ्यांना होणे, यातच त्याचा आनंद होता. पैशाचा दुसरा उद्देश नव्हता. दुसरे प्रयोजन नव्हते. ते पैसे म्हणजे मनूबाबाचे एक प्रेमाचे जणू स्थान होते.
"तुम्हांला कोणाचा संशय येतो का?" त्या प्रमुखाने विचारले.
"हा तुमचा गडी भिकू याचा मला संशय येतो. तो मागे एकदा म्हणाला होता, की तुझे पैसे चोरले पाहिजेत. याला विचारा." मनू म्हणाला.
भिकू एकदम संतापला.
"थोबाड फोडीन बुढ्ढ्या. मी का तुझे पैसे चोरले? संध्याकाळपासून मी इथं आहे. आणि तुझे पैसे तर आता गेले. वा ! कधी थट्टेत बोललो असेन तर त्यासाठी का माझ्यावर आळ घेतोस ?" भिकू रागाने म्हणाला.
"हे पाहा मनू, असं उगाच कोणाचं नाव घेऊ नकोस. भिकू प्रामाणिक आहे. आज किती तरी वर्ष ह्या बड्या वाड्यात तो काम करीत आहे. परंतु त्यानं कधीही कशाला हात लावला नाही." प्रमुख म्हणाला.
"भिकू, मला क्षमा कर. परंतु माझं सोनं? कोणी नेलं माझं सोनं? शोधा हो तुम्ही. पंधरा वर्षांची सारी कमाई गेली, अरेरे ! आता कसा जगू? कसा राहू? जा, कोणी शोधा." तो काकुळतीने म्हणाला.
काही लोक कंदील घेऊन गेले. कोणी हातात काठ्या घेतल्या. कोणी या बाजूला गेले, कोणी त्या. परंतु चोर सापडला नाही. लोक घरोघर झोपले होते. हवेत गारठा होता. संशोधन करणारी मंडळी परत आली.
"सापडलं का सोनं? माझं सोनं?" मनूने विचारले.
"चोराचा पत्ता नाही. सर्वत्र शोधलं. जिकडे तिकडे चिखल झाला आहे. नद्यानाल्यांना पूर आले आहेत. शक्य तो प्रयत्न केला. मनू, झालं ते झालं. असेल आपलं तर परत मिळेल." तो प्रमुख म्हणाला.
"माझंच होतं. माझ्या श्रमाचं होतं सारखं मी काम करीत असे. कधी विश्रांती घेतली नाही." मनू रडत म्हणाला.
"जा आता घरी. काळजी करून काय होणार?" प्रमुख म्हणाला.
मनू आपल्या झोपडीत गेला. तो तेथे बसून राहिला. शून्य दृष्टीने तो
सर्वत्र पाहात होता. हळूहळू त्याचे डोळे मिटले. पहाटे त्याला झोप लागली.
२० * मनूबाबा