पान:मनू बाबा.djvu/५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पित्यासाठी ठेव. मनूबाबा, तुमचं उरलेलं आयुष्य सुखात जावो. राग नका धरू तुम्ही कुणी. क्षमा करा. येतो आम्ही. चला, उठा." इंदुमती पतीचा हात धरून म्हणाली.

 संपतराय उठला. पत्नीने त्याचा हात धरला होता. तिने दाराची कडी काढली. बाहेर गाडीत गाडीवान झोपी गेला होता. परंतु तो एकदम दाराचा आवाज ऐकून जागा झाला. त्याला लाज वाटली. तो एकदम उठून उभा राहिला. धनी व धनीण गाडीत बसली. मनूबाबा व सोनी दारात उभी होती. गाडी निघाली. चाबूक वाजला. घोड्याचा टाप् टाप् आवाज रात्रीच्या शांत वेळी घुमत होता. "फिरून आल्या ‌ श्रीमंताच्या स्वाऱ्या !" जागे असणारे म्हणाले. टाप् टाप् आवाज आता दूर गेला. ऐकू येईनासा झाला. मनूबाबा व सोनी दोघे घरात आली. त्यानी दार लावले. सोनीने म्हाताऱ्याच्या गळ्याला एकदम मिठी मारली. तिला अश्रू आवरत ना. आणि म्हाताऱ्या मनूबाबांनाही पुन्हा जोराचा हुंदका आला. हळूहळू भावना ओसरल्या. बोलायला अवसर झाला.

 "बाबा, तुम्हांला मी कधीही सोडणार नाही."

 "होय हो बाळ. तू गुणाची आहेस."


सोनीचा नकार * ६१