पान:मनू बाबा.djvu/५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सो नी चे
ल ग्न

♣ * * * * * * ♣









 मनूबाबांच्या झोपडीजवळ बाग तयार झाली. बागेला दगडांचे सुंदर कुसू घालण्यात आले होते. बागेत विहीर खणण्यात आली. तिला पाणीही भरपूर लागले. बागेची नीट आखणी करण्यात आली. फुलझाडे लावण्यात आली. लवकर फुलणाऱ्या फुलझाडांचे ताटवे शोभू लागले. लतामंडपही करण्यात आले. त्यांच्यावर वेल सोडण्यात आले. बागेच्या मध्यभागी ती पवित्र जागा होती. तिच्याभोवती फुलझाडे लावण्यात आली होती. मध्ये ती हिरवी जागा शोभे. हळूहळू बागेला रंग येत होता.

 रामूला ज्या वेळी इतर ठिकाणी काम नसे, त्या वेळेस तो बागेत काम करी. कधी कधी तो पहाटे उठे व बागेत येई. तेथे तासभर खपून मग दुसऱ्यांच्या कामावर जाई. एके दिवशी सोनी बाहेर झुंजुमुंजू आहे तोच बागेत आली. तेथे येऊन पाहते, तो रामू फुलझाडांना पाणी घालत आहे !

 "रामू, तू केव्हा आलास ?"

 "तुझ्या आधी आलो. सोनीची बाग सुंदर झाली पाहिजे."

 "ही बाग का फक्त सोनीची ? ती रामूची नाही का ?"

 "दोघांची आहे."

 "रामू, माझ्यासाठी तू दमतोस. माझे मनोरथ पुरावे म्हणून सारखी खटपट करतोस. दिवसभर इतर ठिकाणी काम करून पुन्हा बागेत काम करायलां येतोस."

६२ * मनूबाबा