अहंकार, धनाचे व कुळाचे गर्व, ते काय कामाचे ? श्रीमंतांचे रक्त का निराळं असतं ? श्रीमंत मेले म्हणजे त्यांच्या शरीरांची कस्तुरी होते आणि गरीब मेले म्हणजे त्यांच्या देहाची केवळ माती होते असं का काही आहे ? सारे मातीचेच पुतळे. किंमत असेल तर ती फक्त या मातीच्या मडक्यात असणाऱ्या मोठ्या मनाची, प्रेमळ हृदयाची, उदार विचारांची. मला तुमची श्रीमंती नको. मला इथं या झोपडीत सारं सुख आहे. या झोपडीतील उपासमारही तुमच्या श्रीमंतीतील मेजवान्यांपेक्षा गोड आहे. या झोपडीतील अणुरेणू प्रेममय आहे, कर्तव्यमय आहे. हा माझा स्वर्ग सोडून कुठं येऊ मी? इथेच मी राहीन. माझ्या मनूबाबांजवळ राहीन. तेच माझे खरे आईबाप. त्यांचाच माझ्यावर अधिकार. त्यांचीच माझ्यावर सारी सत्ता. त्यांना का म्हातारपणी सोडूं ? मी का कृतघ्न होऊं ! उद्या त्यांना काय वाटेल ? मी गेल्ये तर ही झोपडी त्यांना खायला येईल. जरा मी डोळ्याआड झाल्ये, तर भिरि भिरी हिंडतात व मला शोधतात. त्यांना काय वाटेल ? त्यांना म्हातारपणी का रडवूं? त्यांचे उरलेले थोडे दिवस, ते का दुःखात दवडायला लावू ! आत्ताच तर माझी त्यांना जरुरी, मीही आता मोठी झाल्ये आहे. आता मी स्वयंपाक करीन, त्यांना आवडतील ते पदार्थ करीन. आता मी केर काढीन, भांडी घाशीन, त्यांचे कपडे धुवीन. त्यांना कढत पाणी आंघोळीला देईन. आता मी त्यांचे अंथरूण घालीन. त्यांचे भक्तिप्रेमाने पाय चेपीन. एखादं चांगलं पुस्तक रात्री त्यांना वाचून दाखवीन. त्यांचा हात धरून त्यांना फिरायला नेईन, त्यांना दोन सुवासिक फुले तोडून देईन. माझ्या बाबांचे उरलेले आयुष्य सुखात जावो. इथंच मी राहीन. माझ्या बाबांजवळ राहीन कुठंसुद्धा जाणार नाही त्यांना सोडून." असे म्हणून सोनीने मनूबाबांच्या गळ्याला मिठी मारली. म्हाताऱ्याच्या डोळ्यांतून धारा लागल्या होत्या.
"सोन्ये, तुझं म्हणणं खरं आहे. रहा हो. इथंच राहा. तुझ्या पित्याला क्षमा कर. त्यांच्याविषयी फार कठोर भाव मनात नको बाळगू. आपण सारी मर्त्य माणसं. पदोपदी चुकणारी व घसरणारी. असो. सुखी राहा. कुठंही अस, पण सुखी राहा. आम्ही मधून लधून काही पाठविले तर ते घेत जा. आम्हाला अगदी परकं नको समजू. हृदयात थोडीशी जागा तुझ्या
६० * मनूबाबा