पान:मनू बाबा.djvu/५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आले असाल किंवा दुसरी काही मदत घेउन आले असाल." मनूबाबा म्हणाला.

 "सोनीला माझं सारंच देण्यासाठी मी आलो आहे. पाच दहा रुपयांची मदत किती दिवस पुरणार ? एखादं पांघरूण किती पुरं पडणार ! सोनीला नेण्यासाठी मी आलो आहे. सोनी आमच्याकडे येऊ दे. आमच्याकडे कायमची राहू दे. सुंदर कोवळी मुलगी. तिला गरिबीचा गारठा नको. रानात फूल फुलतेच. परंतु बागेत अधिक चांगले फुलते. बागेतील फुलांच्या पाकळ्या मोठ्या टपोऱ्या दिसतात. त्याला सुवास अधिक येतो. कारण बागेत नीट वाढ होते. सोनीची नीट वाढ होऊ दे. तिला शिकू दे. मी पंतोजी ठेवीन. तो तिला शिकवील. तसंच भरतकाम वगैरे शिकवायला एक बाई ठेवीन. सोनी कुशल होऊ दे. हुशार होऊ दे. तिचा नीट विकास होऊ दे. मनूबाबा, तुम्ही नाही म्हणू नका. इतके दिवस सोनीचं तुम्ही केलंत, आता आम्हांला करू दे. इतके दिवस तुम्ही घरात मूल असल्याचा आनंद उपभोगलात. सोनीचे आईबाप झालात. आता आम्हांला होऊ दे तिचे आईबाप. आमच्याही घरात मूलबाळ नाही. सोनी आमची मुलगी होऊ दे. सुखात वाढू दे. पुढे तिचं लग्न करू. मोठ्या घराण्यात देऊ. अंगावर हिऱ्यामोत्यांचे दागिने पडतील. घरात गडीमाणसं कामाला असतील. फिरायला जायला घोड्याची गाडी असेल. फुलांच्या बागा असतील. सोनी जशी राजाची राणी होईल. मनूबाबा, असे का खिन्न दिसता ? मी सांगता याचा तुम्हाला नाही आनंद होत ? सोनी एखाद्या गरिबाच्या घरी पडावी असं का तुम्हाला वाटतं ? तिचे हात काबाडकष्ट करून दमावेत असं का तुम्हांस वाटत ? तिच्या अंगावर सुंदर वस्त्रं नसावीत, दागदागिने नसावेत असं का तुम्हासं वाटतं ? सोनी सुखात नांदावी असं तुम्हांला नाही वाटत ? " संपतराय थांबला.

 "सोन्ये, तू सारं ऐकतच आहेस. मी तुझ्या सुखाच्या आड कशाला येऊ ? तुला गरिबीचा वारा लागावा असं मी कसं म्हणू ? माझ्या स्वार्थासाठी मी तुला कशाला दुःखी करू ? मी एकटा राहीन. एकटा होतो, ऐकटा राहीन. माझ्यासाठी तुला नको त्रास, तुला नकोत कष्ट. जातेस त्यांच्याकडे ? माझी आडकाठी नाही. असं नको कुणी म्हणायला, की


५६ * मनूबाबा