म्हातारा मनुबाबा सोनीच्यां सुखाव्या आड आला. माझी सोनी कुठेही असो परंतु सुखात राहो माझं काय ? मी पिकलं पान झालो. आता केव्हा गळून जाईल त्याच्या नेम नाही. जे दोन दिवस जगून या जगात काढायचे असतील ते एकटा राहून काढीन. सोन्ये, काय आहे तुझा विचार ? तुला आता सारं समजतं. तू मोठी झाली आहेस. तू काय ते त्यांनां सांग. ते उदारपणे बोलवीत आहेत. जातेस ?" मनूबाबांनी विचारले.
"मी नाही जात. तुम्हांला सोडून कुठं मी जांऊ ? ही झोपडी म्हणजेच माझा राजवाडा. इथं माझी सारी सुखं आहेत. या झोपडीत साऱ्या गोड आठवणी. झोपडीत आहे ते राजवाड्यात नाही. मला कामाचा कंटाळा नाही. रामू काम करतो. काम करणारा का कमी दर्जाचा ? काम करतो तोच खरा मनुष्य. देवानं मला चांगले हातपाय दिले आहेत. ते का पुजून ठेवु ? मला गडीमाणसं नकोत, दासदासी नकोत. सुंदर वस्त्रं नकोत, दागदागिने नकोत. चार फुलं केसात घातली की पुरे. मला नको श्रीमंती. बाबा, तुमच्याजवळच मला राहू दे. तुम्हीच माझं सारं सुख." सोनी म्हणाली.
" आणि आम्ही नाही का कुणी तुझी ? सोन्ये, ऐक. हे मनूबाबा तुझे मानलेले बाबा आहेत. परंतु तुझे बाबा तुझ्या समोर आहेत. मी तुझा पिता. तुझा जन्मदाता. पंधरा वर्षापूर्वी तू या झोपडीत आलीस, त्या वेळेसच तुला मी नेत होतो. परंतु नेता आलं नाही. आज पंधरा वर्षानंतर पुन्हा तुला न्यायला आलो आहे. तुझ्या पित्याकडे तू नाही येणार ? जन्मदात्याचं नाही ऐकणार ?" संपतराय भावनावश होऊन बोलत होते.
खोलीत गंभीर शांतता पसरली होती. सोनीच्या डोळ्यांत पाणी आले. तिने आपले डोळे पुसले. आता ते डोळे निराळे दिसू लागले. त्या डोळ्यांत कठोरता आली. एक प्रकारचे सात्विक अशा संतापाचे तेज आले. तिने आपला ओठ थोडा चावला. ती जरा क्रुद्ध दिसू लागली. परंतु अद्याप वाणी बाहेर पडत नव्हती. संमिश्र भावनांचा सागर उसळला होता. इतक्यात इंदुमती शांतपणे म्हणाली, "सोन्ये तू ऐक. पित्याचं ऐक. पित्याला सुख देण्यासाठी चल. आज इतकी वर्ष त्यांचा जीव गुदमरला असेल ते ध्यानात आण. किती
सोनीचा नकार * ५७